बेकायदा शस्त्र विकणारी टोळी जेरबंद
By admin | Published: July 24, 2015 03:00 AM2015-07-24T03:00:00+5:302015-07-24T03:00:00+5:30
विनापरवाना पिस्तूलची विक्री करणाऱ्या पाच जणांच्या टोळीला तुर्भे पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून सहा पिस्तुले, १३ मॅग्झीन, ८९
नवी मुंबई : विनापरवाना पिस्तूलची विक्री करणाऱ्या पाच जणांच्या टोळीला तुर्भे पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून सहा पिस्तुले, १३ मॅग्झीन, ८९ काडतुसे, दोन आलिशान वाहने आणि दोन लाख रुपयांची रोख जप्त करण्यात आली आहे.
तुर्भे उड्डाणपूल परिसरातील दत्त मंदिराजवळ काही इसम पिस्तूल विकण्यासाठी येणार असल्याची माहिती तुर्भे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांना मिळाली होती. त्यांनी सापळा रचून अर्शद शफी अन्वर अहमद (२४), दानिश समशाद अली (२३) व मोहम्मद अनस जमिल अहमद (२३) या तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून तीन पिस्तुले, ६ मॅग्झीन व ४० जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली. हे तिन्ही आरोपी उत्तर प्रदेशातून शस्त्रविक्रीसाठी नवी मुंबईत आले होते, अशी माहिती उमाप यांनी दिली. त्यानंतर आरोपींनीच दिलेल्या माहितीच्या आधारे याच ठिकाणी सापळा रचून पुणे येथून पिस्तूल खरेदीसाठी आलेले सचिन दगडू गोस्वामी (३६) व संतोष भीमराव खोसे या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून दोन लाखांची रोकड व बीएमडब्लू कार हस्तगत करण्यात आली. शस्त्र खरेदीसाठी आलेल्या गोस्वामी व खोसे यांच्या पुणे येथील ठिकाणावर छापा मारून तीन पिस्तुले, ७ मॅग्झीन व ४९ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. आरोपींनी ही शस्त्रे राहत्या सोसायटीत मर्सिडीजमध्ये दडवली होती. पोलिसांनी कारही जप्त केली आहे.
शस्त्र विक्रीसाठी आलेल्या आरोपींचे आणखी कोणी साथीदार आहेत का, त्यांनी यापूर्वी आणखी कोणाला शस्त्रे विकलीत, याचा पोलीस शोध घेत आहेत. दरम्यान, शस्त्र खरेदीसाठी पुण्याहून आलेल्या संतोष खोसे याचा जमीन खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे. तो सधन असल्याने त्याने ही शस्त्रे का विकत घेतली होती, अवैध शस्त्र खरेदी-विक्री व्यवसायात त्याचा सहभाग आहे का, त्याच्यावर यापूर्वी गुन्ह्याची नोंद आहे का, या सर्व बाबींची पडताळणी केली जात आहे, अशी माहिती परिमंडळ १ चे पोलीस आयुक्त शहाजी उमाप यांनी दिली. यावेळी सहाय्यक पोलीस आयुक्त धनराज दायमा, तुर्भे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे उपस्थित होते.