गुंड जगदीश गायकवाडने पोलिसांच्या अंगावर घातली गाडी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2022 01:18 PM2022-12-01T13:18:39+5:302022-12-01T13:19:14+5:30
‘वंचित’चे नेते प्रकाश आंबेडकर यांना केली होती शिवीगाळ
लोकमत न्यूज नेटवर्क
पनवेल : वंचित बहुजन विकास आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्याविरोधात अर्वाच्च भाषेत शिविगाळ केल्याप्रकरणी कळंबोली पोलिसांनी पनवेलमधील गुंड आणि माजी उपमहापौर जगदीश गायकवाड याला अटक केली. बुधवारी अटक करून पनवेल न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने जामीन मंजूर केला. त्याचवेळी दुसऱ्या गुन्ह्यात कर्जत पोलिस त्यास अटक करण्यासाठी आले असता त्याने पळून जाण्याचा प्रयत्न करून पोलिसांच्या अंगावर गाडी घातली. यामुळे तिथे घबरटा पसरली. यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली.
शिविगाळ केल्याचा ऑडिओ झाला व्हायरल
n दलित नेत्यांच्या विरोधात अतिशय अर्वाच्च भाषेत शिविगाळ केल्याचा गायकवाड याचा ऑडिओ समाज माध्यमांमध्ये प्रचंड व्हायरल होत असल्याने त्याच्याविरोधात प्रचंड आक्रोश निर्माण झाला आहे.
n आंबेडकरांसह केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनाही त्याने अश्लाघ्य भाषेत शिविगाळ केली होती. यानंतर त्याची रिपाइंच्या रायगड जिल्हाध्यक्षपदावरून हकालपट्टी केली.
n बुधवारी त्याच्याविरोधात वंचित बहुजन आघाडीने मोर्चाही काढला होता. मंगळवारी त्याच्या घरावरही जमावाने दगडफेक केली होती.
तडिपारीचीही केली होती कारवाई
नवी मुंबई विमानतळाच्या आंदोलनप्रसंगी त्याने तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात घाणेरड्या भाषेत टीका केली होती. यानंतर त्यास तडिपार करण्यात आले हाेते. मात्र, केंद्रीय मंत्री आठवले यांच्या मध्यस्थीनंतर त्याची तडिपारी मागे घेण्यात आली होती.