कोरोनाकाळात पेणच्या मूर्तिकारांना पावला गणपती बाप्पा!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2021 08:26 AM2021-09-09T08:26:45+5:302021-09-09T08:27:21+5:30
२५० ते २७० कोटींची उलाढाल; देश-विदेशात बाप्पांच्या तब्बल सव्वा लाख मूर्ती रवाना
नरेश पवार
वडखळ (रायगड) : कोरोना, महागाई, लॉकडाऊन, कामगारांची कमतरता, चक्रीवादळाचा तडाखा, अतिवृष्टीमुळे गणेशमूर्ती भिजून नुकसान झाले असताना पेण तालुक्यातील गणेश मूर्ती कारखानदारांनी चिकाटीने व्यवसाय करीत यंदाही २५ ते ३० लाख गणेशमूर्तींची विक्री केली आहे. त्यातून सुमारे २५०ते २७० कोटींची उलढाल झाली असून, यंदा गणेश मूर्तिकारांना बाप्पा पावल्याचे चित्र आहे.
पेणच्या मूर्तींना ग्राहकांनी पसंती दिल्याचे पुन्हा दिसून आले. दगडूशेठ हलवाई, टिटवाळा, पेशवाई, शिवरेकर, लालबागचा राजा, चिंतामणी, मोरेश्वर, अष्टविनायक, गरुडावर स्वार बाप्पा, खेकड्यावर स्वार बाप्पा यासह इतर विविध प्रकारच्या गणेशमूर्तींना ग्राहकांनी पसंती दिली आहे. पेण शहरासह तालुक्यातील हमरापूर, जोहे, कळवा, तांबडशेत, शिर्की, बोरी, वढाव येथील कारखान्यांत साकारण्यात येणाऱ्या बाप्पाच्या मूर्ती महाराष्ट्रासह देशातील विविध राज्यांमध्ये, तर विराजमान होतातच, याव्यतिरिक्त देश-विदेशातही सव्वा लाख बाप्पांच्या मूर्ती रवाना झाल्या आहेत.
एसटी, रेल्वे बंदचा फटका
कोकण रेल्वे बंद असल्याने रेल्वेमधून कोकणात जाणाऱ्या सुमारे २००० ते २५०० मूर्ती यावर्षी कोकणात गेल्याच नाहीत. त्यामुळे गणेशमूर्ती कारखानदारांना २० ते २५ लाखांचा फटका बसला आहे.
पीओपीच्या गणेशमूर्तींना पसंती
n ग्राहकांनी पीओपीच्या गणेशमूर्तींना अधिक पसंती दिली असून, शाडू मातीच्या गणेशमूर्ती विक्रीविना पडून राहिल्या आहेत.
n केंद्र सरकारच्या पीओपी मूर्तीवरील बंदीच्या धरसोड धोरणाचा फटका गणेशमूर्ती कारखानदारांना बसला आहे.
n पीओपीच्या मूर्ती या मातीच्या मूर्तीपेक्षा वजनाला कमी व दिसायला आकर्षक असतात, त्याचप्रमाणे त्यांची किंमतही कमी असते. तसेच हाताळण्यास व वाहतुकीसही योग्य असतात.
बाप्पाच्या मूर्ती ३० ते ४० टक्क्यांनी महाग
n महागाईचा फटका बाप्पांच्या मूर्तींनाही बसला असून, यावर्षी गणेशमूर्तीं ३० ते ४० टक्क्यांनी महागल्या आहेत. गणेशमूर्तीसाठी लागणारी पीओपी व शाडूमाती गुजरातवरून मागविण्यात येते. ही मातीही महागली आहे.
n गणपतीसाठी वापरण्यात येणाऱ्या रंगाच्या किमतीतही २५ ते ३० टक्क्यांची वाढ झाली आहे. पेट्रोल व डिझेलच्या दरात मागील दोन वर्षांत झालेल्या वाढीमुळे वाहतुकीचा खर्च ३० ते ४० टक्क्यांनी वाढला आहे.
n महागाईमुळे गणेशमूर्ती कारागिरांच्या पगारातही १० टक्के वाढ झाली असल्याने कोरोना, महागाई, लॉकडाऊन नैसर्गिक आपत्तीवर मात करून गणेशमूर्ती कारखानदारांनी विपरीत परिस्थितीचाही सामना करून आपली परंपरा कायम राखली आहे.
कोरोनाकाळात कामगारांची कमतरता असल्याने घरातील सर्वच मंडळी यावर्षी मूर्ती घडविण्यात सामील झाली होती. शाळा बंद असल्याने मुलांनीदेखील आपल्या वडिलांच्या व्यवसायात मदत केली व श्रींच्या अनेक आकर्षक मूर्ती घडविल्या. अनेक संकटांवर मात करूनदेखील पेणच्या गणेशमूर्तिकारांनी आकर्षक, सुबक मूर्ती घडविण्याचे काम केले.
- कुणाल पाटील, मूर्तिकार, कुणाल कला केंद्र, हमरापूर, पेण