पदपथांवरील गॅरेज ठरताहेत डोकेदुखी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2018 03:07 AM2018-08-08T03:07:23+5:302018-08-08T03:07:35+5:30
शहरात जागोजागी पदपथांवर चालणारे गॅरेज नागरिकांची डोकेदुखी ठरू लागली आहे. दुरुस्तीसाठी येणारी वाहने रस्त्यावर तसेच पदपथांवर उभी केली जात आहेत.
- सूर्यकांत वाघमारे
नवी मुंबई : शहरात जागोजागी पदपथांवर चालणारे गॅरेज नागरिकांची डोकेदुखी ठरू लागली आहे. दुरुस्तीसाठी येणारी वाहने रस्त्यावर तसेच पदपथांवर उभी केली जात आहेत. यामुळे रहदारीला अडथळा होत असतानाच रात्री-अपरात्री चालणाऱ्या दुरुस्तीच्या कामांमुळेही रहिवाशांना त्रास सहन करावा लागत आहे.
एकविसाच्या शतकाचे शहर म्हणून ओळखल्या जाणाºया नवी मुंबईचे बहुतांश रस्ते, पदपथ, मोकळी मैदाने गॅरेजचालकांनी व्यापली आहेत. त्यापैकी सर्वाधिक गॅरेज रहिवासी जागेत कोणत्याही परवानगी शिवाय अनधिकृतपणे चालवले जात आहेत. त्यांच्यावर कारवाईत संबंधित प्रशासनाची डोळेझाक होत असल्याचेही पाहायला मिळत आहे. परिणामी, गॅरेजची वाढती संख्या शहरवासीयांची डोकेदुखी ठरू लागली आहे. गॅरेजमध्ये दुरुस्तीसाठी येणारी चारचाकी तसेच दुचाकी वाहने रस्त्यालगत अथवा पदपथांवर उभी केली जात आहेत. त्यापैकी नादुरुस्त वाहनांचे भंगार वर्षानुवर्षे रस्त्यालगतच साठवले जाते. यामुळे पादचाºयांना तसेच वाहनांच्या रहदारीला अडथळा होत आहे. काही ठिकाणी पालिका व वाहतूक पोलिसांकडून अनेकदा कारवाया झाल्या आहेत. मात्र, कारवाईनंतर दुसºयाच दिवशी पुन्हा त्या ठिकाणी गॅरेजची दुकाने थाटल्याचे पाहायला मिळत आहे. यावरून प्रशासनाकडूनच त्यांना अभय मिळत असून कारवाईचा दिखावा होत असल्याचा आरोप होत आहे.
सद्यस्थितीला शहरातील प्रत्येक गावांभोवती असे प्रत्येक नोडमध्ये गॅरेज पाहायला मिळत आहेत. वाशी सेक्टर १७, कोपरखैरणे, जुहूगाव, नेरुळ डी. वाय. पाटील समोर तसेच सेक्टर १३, बेलापूर व घणसोली नोड यासह पाम बीच मार्गाचाही त्यात समावेश आहे. सर्वच गॅरेज मुख्य रस्त्यालगत तसेच अंतर्गतच्या रस्त्यावर असल्याने वाहन दुरुस्तीची कामेही रस्त्यावरच केली जातात. अशा वेळी दुरुस्तीदरम्यान रस्त्यावर सांडलेले आॅइल अपघाताला कारणीभूत ठरत आहेत. तर काही गॅरेज रात्री उशिरापर्यंत चालवली जात आहेत. त्यांच्याकडून अवजारांच्या ठोकाठोकीचा आवाज तसेच जोरजोराने लावल्या जाणाºया गाण्यांमुळे परिसराची शांतता भंग होत आहे. याचा सर्वाधिक त्रास रुग्ण व्यक्तींसह लहान मुले व वृद्ध व्यक्तींना होत आहे.
पालिकेने पादचाºयांच्या सुरक्षेसाठी तसेच पदपथावरून दुचाकी चालवल्या जाऊ नयेत, याकरिता लोखंडी बेरियर्स बसवले आहेत; परंतु अनेक ठिकाणी असे लोखंडी बेरियर्स तोडून गॅरेजच्या दुकानाची वाट मोकळी करण्यात आलेली आहे. अशाच गॅरेजमुळे पाम बीच मार्गावर एपीएमसी येथे मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होत आहे. त्या ठिकाणी अनेकदा कारवाई करूनही ते बंद करण्यात पालिका व वाहतूक पोलीस अपयशी ठरल्याचे दिसून येत आहे. जादा भाड्याच्या लालचेपोटी रहिवासी इमारतीमधील व्यावसायिक गाळे गॅरेजला भाड्याने दिले जातात. त्यामुळे जागा मिळेत तिथे गॅरेजची दुकाने थाटली जात आहेत. परिणामी, शहरातील प्रत्येक गावासह सिडको विकसित नोडला गॅरेजचा विळखा बसला आहे. तर त्या ठिकाणी उभी केली जाणारी वाहने, भंगार यामुळे परिसरालाही बकालपणा आला आहे.
>पोलिसांच्या भूमिकेकडे लक्ष
नवनियुक्त आयुक्तांसह वाहतूक शाखा उपआयुक्तांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शहरातल्या समस्या निकाली काढण्याच्या अनुषंगाने ते कशा प्रकारची उपाययोजना राबवतील याची उत्सुकता आहे. त्यानुसार वाहतूक पोलिसांनाही कारवाईचे स्वातंत्र्य मिळाल्यास गॅरेजची समस्या कायमची मिटण्याची शक्यता आहे.
>प्लाझा संकल्पना कागदावरच
गॅरेजच्या त्रासापासून नागरिकांची सुटका करण्यासाठी सात वर्षांपूर्वी महापालिकेने एमआयडीसीपुढे एक संकल्पना मांडली. त्याद्वारे एमआयडीसी क्षेत्रात भव्य गॅरेज प्लाझा उभारले जाणार होते. त्यामध्ये शहरातील सर्वच गॅरेज व्यावसायिकांना एकत्र समावून घेतले जाणार होते; नागरी लोकवस्तीबाहेर जाण्यास गॅरेज व्यावसायिकांनी विरोध दर्शवत या संकल्पनेत खो घातला. तेव्हापासून ही संकल्पना बारगळली असून रहिवासी क्षेत्रातच गॅरेजची दुकाने ठाम मांडून आहेत.