पनवेल : तापमान वाढल्याने सध्या नागरिकांची काहिली होत आहे. त्यातच पनवेल तालुक्यातील काही गावे व पाडे पाणीटंचाईने त्रस्त आहेत. आदिवासी वाड्यातील ग्रामस्थांनाही पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. गारमाळ येथील आदिवासी वाडीतील नागरिकांची सध्या पाण्यासाठी भटकंती सुरू झाली आहे.तालुक्यातील मोरबे परिसरात गारमाळ आदिवासी वाडी वसलेली आहे. जवळपास या वाडीत ४० घरे असून २०० आदिवासी बांधव राहत आहेत. पाण्यासाठी येथील आदिवासींना विहिरीतील पाण्यावर अवलंबून राहावे लागते. मात्र उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले असल्याने विहिरीतील पाणी दिवसेंदिवस कमी होत चालले आहे. त्यामुळे आदिवासींना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. शासनाने आदिवासी समाजाला सेवा सुविधा देण्याच्या कितीही वल्गना केल्या तरी देखील योजना त्यांच्यापर्यंत पोहोचतात की नाही याची शहानिशा करणे गरजेचे झाले आहे.वीज, पाणी, शिक्षण यासारख्या मूलभूत सुविधांपासून काही आदिवासी समाज आजही वंचित राहिला आहे. पाण्यासाठी आदिवासींना वणवण फिरावे लागते. डोक्यावर हंडे घेऊन आदिवासी समाजाला पाण्यासाठी मैलभर चालत जावे लागते. वर खाली, वळणे असलेल्या रस्त्यात पडल्यामुळे गंभीर दुखापत होण्याची भीती असताना देखील आदिवासी समाज सुविधांच्या प्रतीक्षेत आहे.>मोरबे धरणाच्या वरील भागात असलेल्या गारमाळ आदिवासी वाडीतील विहिरीचे पाणी कमी होत चालले आहे. उन्हाळ्याला नुकतीच सुरु वात झाली आहे. त्यामुळे पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण होत चालले आहे. त्यामुळे गारमाळ आदिवासी वाडीची पाणीटंचाई दूर करण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न होणे गरजेचे आहे.
गारमाळ आदिवासीवाडी पाणीटंचाईने त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 2:53 AM