धोकादायक इमारतीमध्ये गर्दुल्ल्यांचे अड्डे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2019 02:07 AM2019-06-11T02:07:35+5:302019-06-11T02:07:56+5:30

नेरूळमधील प्रकार : परिसरातील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण

Garandlu's base in a dangerous building | धोकादायक इमारतीमध्ये गर्दुल्ल्यांचे अड्डे

धोकादायक इमारतीमध्ये गर्दुल्ल्यांचे अड्डे

Next

नामदेव मोरे 

नवी मुंबई : महापालिकेने धोकादायक घोषित केलेल्या नेरूळमधील दत्तगुरू गृहनिर्माण सोसायटीमध्ये गर्दुल्ल्यांचा अड्डा तयार झाला आहे. इमारतीमध्ये दिवस-रात्र गांजा व इतर अमली पदार्थांचे सेवन करत अनेक जण बसलेले असतात. रात्री समोरील उद्यानामध्येही संबंधितांची गर्दी पाहावयास मिळत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

देशातील स्वच्छ व राहण्यासाठी सर्वोत्तम शहर म्हणून नावलौकिक असलेल्या नवी मुंबईमध्ये अमली पदार्थ विक्रेत्यांनी त्यांचे जाळे पसरविण्यास सुरवात केली आहे. तरुणांना व्यसनांच्या जाळ्यात अडकवून त्यांना गांजासह चरस, एमडी पावडरसह इतर अमली पदार्थ पुरविले जात आहेत. पूर्वी एपीएमसी, तुर्भे परिसरातील हे अड्डे शहराच्या सर्व भागामध्ये सुरू होत आहेत.
नेरूळमध्ये बालाजी टेकडी, सेक्टर २०, सारसोळेमधील रामलीला मैदानाच्या बाजूची मोकळी जागा व सेक्टर ६ मधील उद्यान परिसरामध्ये अनेक तरुण गांजा ओढत बसलेले असतात. येथील दत्तगुरू गृहनिर्माण सोसायटीमधील दोन्ही इमारती महापालिकेने अतिधोकादायक घोषित केल्या आहेत. या इमारतीचा वापरही थांबविण्यात आला असून याचाच गैरफायदा अमली पदार्थांचे सेवन करणाऱ्यांकडून घेण्यात येत आहे.
२४ तास या इमारतीमध्ये गर्दुल्ल्यांचा वावर पाहावयास मिळत आहे. २० ते २५ मुले गांजा व इतर अमली पदार्थांचे सेवन करत आहेत. इमारतीमधील काही सदनिकांचे दरवाजे तोडले आहेत. त्यामध्ये मद्याच्या बाटल्या, चरससारखे अमली पदार्थ ओढण्यासाठीचे असणारे कागद व इतर वस्तू आढळून येत आहेत. गृहनिर्माण सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी दोन वेळा सुरक्षारक्षकाची नियुक्ती केली होती. परंतु व्यसनाधीन तरुणांच्या धमक्यांमुळे सुरक्षारक्षक येथे काम करत नाही.
पूर्वी महापालिकेने बांधलेल्या मार्केटमध्ये रात्री ११ नंतर गांजा ओढणाºयांची व मद्यपींची मैफल सुरू असायची. तक्रारी करूनही पोलिसांनी येथील अड्डा बंद करण्यासाठी ठोस कारवाई केली नाही. पालिकेने मार्केट पाडल्यानंतर संबंधितांनी उद्यानामध्येच बसण्यास सुरवात केली. त्यामुळे उद्यानात रात्री उशीरापर्यंत फेरफटका मारण्यासाठी येणाºयांनी याठिकाणी फिरकणे बंद केले.
अनेकांना या तरुणांनी धमकावल्याच्या घटना घडल्या आहेत. नागरिकांनी पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करूनही वारंवार तक्रारी दिल्या आहेत. लोकप्रतिनिधींच्याही हा प्रकार निदर्शनास आणून दिला आहे. येथील अमली पदार्थ सेवन करणाºयांचा अड्डा बंद केला नाही तर भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची भीती रहिवाशांनी व्यक्त केली आहे.

गर्दुल्ल्याकडून एकावर जीवघेणा हल्ला
च्गांजा ओढत बसलेल्या तिघांना हटकल्याने एका व्यक्तीवर जीवघेणा हल्ला झाल्याचा प्रकार कोपरी पुलाखाली घडला आहे. त्याठिकाणी रात्री तिघे जण गांजा ओढत बसले असता, सदर व्यक्तीने त्यांना हटकण्याचा प्रयत्न केला. याचा राग मनात धरून गांजा ओढत बसलेल्यांपैकी एकाने सदर व्यक्तीवर जीवघेणा हल्ला करून पळ काढला.
च्राजकुमार शुक्ला (३८) असे गर्दुल्ल्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. ते एपीएमसी मसाला मार्केटमधील सुरक्षारक्षक एजन्सीचे प्रमुख आहेत. त्यानुसार मार्केटमधील काम उरकून ते मित्रासोबत मोटरसायकलवरून कोपरी येथील घरी चालले होते. त्यांची मोटारसायकल कोपरी पुलाखाली आली असता, त्याठिकाणी अंधारामध्ये तिघे जण गांजा ओढत बसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यावरून त्यांनी सदर गर्दुल्ल्यांना हटकण्याचा प्रयत्न केला असता, दोघांनी पळ काढला. मात्र एकाने त्यांच्यावर लाकडी दांडक्याने हल्ला करत, पोलिसांकडे तक्रार केल्यास पुन्हा मारण्याची धमकी देऊन तिथून पळ काढला. गर्दुल्ल्याने केलेल्या या हल्ल्यात शुक्ला हे गंभीर जखमी झाले असता, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयातून सुटल्यानंतर त्यांनी कोपरी पुलाखाली घडलेल्या प्रकाराची तक्रार पोलिसांकडे केली. त्यानुसार एपीएमसी पोलिसांनी रामचंद्र लालजी मिश्रा (४५) याला अटक केली आहे. तो परिसरातच सुरक्षारक्षकाचे काम करत असून कोपरी पुलाखालीच राहणारा आहे. तर त्याच्या इतर दोघा साथीदारांचा पोलीस शोध घेत आहेत.
च्कोपरी पुलाखालील परिसरात रात्रीच्या वेळी अंधार पसरलेला असतो. पथदिवे असूनही ते बंद असल्याने गर्दुल्ल्यांना त्याठिकाणी आडोशाची जागा मिळत आहे. तर पुलाखालील जागेत त्यांनी अड्डा बनवल्याने रात्रीच्या वेळी त्याठिकाणावरून प्रवास करणाºयांच्याही सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत आहे. अनेकदा दिवसा त्याठिकाणी वाहतूक पोलिसांची तसेच एपीएमसी पोलिसांची तपासणी देखील सुरू असते. परंतु रात्रीच्या वेळी त्याठिकाणी गस्त होत नसल्याने अशा प्रकारच्या गुन्हेगारी घटना घडत आहेत.

तक्रारी करूनही पोलिसांचे दुर्लक्ष
सेक्टर ६ परिसरातील गांजासह इतर अमली पदार्थ ओढणाºयांविषयी नागरिकांनी व लोकप्रतिनिधींनी वारंवार पोलिसांकडे तक्रारी दिल्या आहेत. दिवसेंदिवस व्यसन करण्यासाठी येणाºया तरुणांची संख्या वाढत आहे. रात्री उशिरापर्यंत येथे गर्दी असते. उद्यानामध्ये व दत्तगुरू सोसायटीपासून ये - जा करतानाही भीती वाटत आहे. पोलीस नियंत्रण कक्षाकडेही तक्रारी दिल्या आहेत. पण पोलीस ठोस कारवाई करत नसल्यामुळे तक्रार करायची कोणाकडे अशी प्रतिक्रिया नाव न सांगण्याच्या अटीवर अनेकांनी दिली.

सदनिकाधारकही धास्तावले
दत्तगुरू गृहनिर्माण सोसायटीमधील नागरिकांनी घरे खाली करून इतर ठिकाणी भाडेतत्त्वावर घर घेतले आहे. इमारतीमध्ये कोणी अतिक्रमण करू नये यासाठी येथे सुरक्षारक्षकाचीही नियुक्ती केली होती. परंतु अमली पदार्थ ओढणाºयांच्या दहशतीमुळे सुरक्षारक्षकही येथे टिकत नाही. सदनिकाधारकांनाही इमारत आवारात येण्याची भीती वाटू लागली असल्याची प्रतिक्रियाही रहिवाशांनी व्यक्त केली.

नागरिकांना धमक्या
अमली पदार्थ सेवन करणारे तरुण धोकादायक इमारत, रात्री समोरील उद्यान व मैदानामध्येही बसत आहेत. एक महिन्यापूर्वी रात्री १२ वाजता एक व्यक्ती चालण्याचा व्यायाम करण्यासाठी मैदानात आली होती. सकाळी लवकर कामावर जावे लागत असल्यामुळे रात्री घरी आल्यानंतर चालण्याचा व्यायामासाठी येथील जॉगिंग ट्रॅकवर येणाºया या व्यक्तीला गांजा ओढणाºया तरुणांनी धमकावले होते. त्या व्यक्तीने तत्काळ १०० नंबरवर संपर्क करून पोलिसांना याची माहिती दिली होती. पण काहीही उपयोग झाला नसल्यामुळे त्यांनी मैदानामध्ये जाणेच बंद केले.

Web Title: Garandlu's base in a dangerous building

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.