निर्यात भवनला कचराकुंडीचे स्वरूप

By admin | Published: October 15, 2015 02:08 AM2015-10-15T02:08:29+5:302015-10-15T02:08:29+5:30

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फळ मार्केटमधील निर्यात भवन इमारतीची दुरवस्था झाली आहे. पूर्ण इमारतीमध्ये कचऱ्याचे साम्राज्य तयार झाले आहे

The garbage collection in the export house | निर्यात भवनला कचराकुंडीचे स्वरूप

निर्यात भवनला कचराकुंडीचे स्वरूप

Next

नामदेव मोरे, नवी मुंबई
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फळ मार्केटमधील निर्यात भवन इमारतीची दुरवस्था झाली आहे. पूर्ण इमारतीमध्ये कचऱ्याचे साम्राज्य तयार झाले आहे. सर्वत्र प्रचंड दुर्गंधी पसरली आहे. कृषी मालाचे पॅकिंग करतानाही स्वच्छतेची काळजी घेतली जात नाही. मार्केटमध्ये सुरक्षा उपकरणे नसल्यामुळे कोणत्याही क्षणी आग लागून मोठी दुर्घटना होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
आशिया खंडामधील सर्वात मोठी सहकारी बाजारपेठ म्हणून मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीची ओळख आहे. पूर्वी या मार्केटमधील कामकाजाची पाहणी करण्यासाठी देशातून व्यापारी व शासकीय संस्थेचे पदाधिकारी यायचे. कृषी विद्यापीठाचे व व्यवस्थापन शास्त्राचे विद्यार्थीही मार्केटला भेट देत होते. परंतु अनागोंदी कारभारामुळे मार्केट बकाल झाले आहे. निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी फळ मार्केटमध्ये दोन मजली निर्यात भवन उभारण्यात आले आहे. परंतु या निर्यात भवनची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. येथील निर्यातदाराचे कार्यालय वातानुकूलित व स्वच्छ आहे. परंतु इतर ठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरले आहे. इमारतीच्या बाहेरच कचऱ्याचे ढीग पाहावयास मिळतात. इमारतीमध्येही जिन्याजवळ व प्रत्येक मजल्यावर मोठ्या प्रमाणात कचरा पडला आहे. ये - जा करण्यासाठी असलेल्या पॅसेजमध्ये पॅकिंग करावयाचे पुठ्ठे ठेवण्यात आले आहेत. विद्युत मीटर बॉक्सला लागून कागदी पुठ्ठे व इतर कागदांचे गठ्ठे ठेवले आहेत. कोणत्याही क्षणी या ठिकाणी आग लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. इमारतीमध्ये सुरक्षेची कोणतीही उपकरणे बसविण्यात आलेली नाहीत.
निर्यात करण्यात येणाऱ्या मालाचा दर्जा अत्यंत चांगला असणे आवश्यक आहे. याशिवाय त्याची पॅकिंगही उत्तम दर्जाची असली पाहिजे. परंतु निर्यात भवनमध्ये परप्रांतीय कामगारांकडून पॅकिंग करून घेतली जाते. या कामगारांचे कपडे अत्यंत तोटके व अस्वच्छ असतात. त्यांच्या हातामध्ये मोजेही नसतात. पदपथावरील मंडईत पाठविण्यात येत असलेल्या मालाप्रमाणे चित्र याठिकाणी पहावयास मिळत आहे. चांगल्या दर्जाचा माल व पॅकिंगही आकर्षक असले तरी मालाची हाताळणीही व्यवस्थित झाली पाहिजे याकडे कोणीच लक्ष देत नाही. सर्वच प्रसाधनगृहांची प्रचंड दुरवस्था झाली आहे.

Web Title: The garbage collection in the export house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.