शहरातील रेल्वे स्थानके बनली कचऱ्याचे आगार
By admin | Published: April 18, 2017 03:13 AM2017-04-18T03:13:22+5:302017-04-18T03:13:22+5:30
सिडकोने नवी मुंबई परिसरात अत्याधुनिक रेल्वे स्थानके उभारली आली आहेत. मात्र याच रेल्वे स्थानकांमध्ये कचरा न उचलल्या गेल्याने स्थानकांचे विद्रूपीकरण झाले आहे
नवी मुंबई : सिडकोने नवी मुंबई परिसरात अत्याधुनिक रेल्वे स्थानके उभारली आली आहेत. मात्र याच रेल्वे स्थानकांमध्ये कचरा न उचलल्या गेल्याने स्थानकांचे विद्रूपीकरण झाले आहे. प्रलंबित मागण्यांसाठी सफाई कामगारांनी बुधवारपासून पुकारलेल्या बंदमुळे रेल्वे स्थानक परिसरात कचऱ्याचा ढीग साचला आहे. सहा दिवसांपासून सुरू असलेल्या सफाई कामगारांच्या या संपाचे गंभीर परिणाम पाहायला मिळत आहेत.
सर्वच रेल्वे स्थानकांमध्ये प्रवाशांना कचऱ्यातून मार्ग काढावा लागत आहे तर गेल्या काही दिवसांपासून पडलेल्या कचऱ्यामुळे दुर्गंधी पसरली आहे. नाकाला रुमाल लावून लोकलचा प्रवास करावा लागत असल्याने प्रवासीवर्गाने नाराजी व्यक्त केली आहे. नवी मुंबई, पनवेल परिसरातील सर्वच रेल्वे स्थानकांमध्ये कचऱ्याचा ढीग साचला आहे. सहा दिवसांपासून कचरा न उचलल्याने कचराकुंड्यांबाहेरही मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. तिकीट घर, फलाटांकडे जाणारा मार्ग आदी परिसरात जागोजागी कचरा साचला आहे. अस्वच्छतेमुळे माश्यांचे प्रमाण वाढले असून रोगराई वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. वाशी, बेलापूर रेल्वे स्थानकांच्या इमारतीमध्ये इन्फोटेक पार्क उभारण्यात आले असून याठिकाणी सिडकोच्या वतीने स्वच्छतेसाठी ठेकेदारांची नेमणूक केली आहे. मात्र सफाई कामगारांच्या समस्या लवकरात लवकर सोडविल्या जाव्यात याकरिता पुकारण्यात आलेल्या बंदमुळे या संपूर्ण परिसराची दयनीय अवस्था झाल्याचे पाहायला मिळते. अनेक रेल्वे स्थानक परिसरात खाद्यपदार्थांचे गाळे असून या दुर्गंधीयुक्त परिसरातील अन्नपदार्थ चाखणे म्हणजे रोगांना आमंत्रण देण्यासारखे होय. कचऱ्यामुळे स्थानक परिसरात उंदीर, कुत्र्यांचा वावर वाढल्याने प्रवासी हैराण झाले आहेत. लवकरात लवकर कचऱ्याची विल्हेवाट न लावल्यास दुर्गंधी तसेच अस्वच्छतेमुळे प्रवाशांना लोकल प्रवास करणे त्रासदायक ठरणार आहे. स्थानकातील कचराकुंड्यांचीही दुरवस्था झाली आहे. (प्रतिनिधी)