नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती मुख्यालय इमारतीच्या आवारात कचऱ्याचे ढीग तयार झाले आहेत. खराब झालेले टायर, वापरात नसलेल्या मोटरसायकल, फर्निचर ठेवण्यात आले आहेत. यामुळे स्वच्छतेला अडथळा निर्माण होत असून स्वच्छता अभियानादरम्यान तरी येथील कचरा उचलण्यात यावा अशी मागणी होत आहे.नवी मुंबई महानगरपालिकेच्यावतीने आयोजित केलेल्या स्वच्छता अभियानाला शासकीय व निमशासकीय कार्यालयांकडून अद्याप अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. अनेक सरकारी कार्यालयांच्या परिसरात कचऱ्याचे ढीग दिसत आहेत. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती मुख्यालयाच्या इमारतीच्या वाहनतळ परिसरातील कचरा अनेक वर्षांपासून हटविला जात नाही. या ठिकाणी बाजार समितीच्या वाहनांचे वापर करून झालेले टायर टाकण्यात आले आहेत. कार्यालयातील फर्निचरचा कचराही याच ठिकाणी टाकण्यात आला आहे. बाजार समिती कर्मचाऱ्यांनी त्यांच्या वापरात नसलेल्या मोटरसायकलही या ठिकाणी उभ्या केल्या आहेत. यामुळे वाहनतळ परिसराला गोडाऊनचे स्वरूप प्राप्त झाले आहे. मुख्यालय इमारतीच्या मागील बाजूला जुने पत्रे व बांधकामाचे साहित्यही ठेवण्यात आले आहे. सांडपाणीही वाहून नेणारी वाहिनी फुटल्यामुळे पाणी वरती येत आहे. बाजार समिती प्रशासनाने कांदा-बटाटा मार्केटच्या लिलावगृहाजवळ स्वच्छता अभियानाचे बॅनर लावले आहेत. परंतुु प्रत्यक्षात मात्र अभियान गांभीर्याने राबविले जात नसल्याचे निदर्शनास आले आहे.मार्केटमध्येही श्रमदान करण्याची मागणीमुंबई बाजार समितीमध्ये प्रशासन व व्यापारी, कामगार यांचा स्वच्छता अभियानामध्ये सक्रिय सहभाग हवा आहे. यासाठी सर्व घटकांनी एकत्र येऊन स्वच्छता अभियान राबविणे आवश्यक आहे. या अभियानामध्ये कोणती कामे करायची याचेही नियोजन करणे आवश्यक आहे. प्रशासन व संचालक मंडळाने यासाठी कार्यवाही करावी, अशी मागणी होऊ लागली आहे.
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती मुख्यालय परिसरात कचऱ्याचे ढीग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 07, 2021 12:22 AM