उद्यान विभागाची झाडाझडती
By admin | Published: June 22, 2017 12:29 AM2017-06-22T00:29:33+5:302017-06-22T00:29:33+5:30
उद्यान निर्मिती व देखभाल दुरुस्तीवर प्रत्येक वर्षी करोडो रुपये खर्च केले जात आहेत. परंतु सद्यस्थितीमध्ये उद्यानांची योग्य देखभाल केली जात नाही
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : उद्यान निर्मिती व देखभाल दुरुस्तीवर प्रत्येक वर्षी करोडो रुपये खर्च केले जात आहेत. परंतु सद्यस्थितीमध्ये उद्यानांची योग्य देखभाल केली जात नाही. वृक्ष सुकत आहेत. खेळण्यांची व बैठक व्यवस्थेची दुरवस्था झाली आहे. प्रशासनाचे नियंत्रण राहिलेले नाही. देखभालीची सक्षम यंत्रणाच नाही. उद्यानांमध्ये लाल माती, खत पुरविण्याच्या कामांचीही चौकशी करण्यात गरज असल्याची मागणी नगरसेवकांनी स्थायी समितीच्या बैठकीमध्ये केली आहे.
आयुक्तांच्या अधिकारामध्ये शहरातील उद्यानांची देखभाल व दुरूस्ती नवीन उद्यानांची निर्मिती करण्यासाठी केलेल्या खर्चाचे विवरण माहितीसाठी सादर करण्यात आले हाते. ३७ ठिकाणी केलेल्या कामांवर ४ कोटी ३१ लाख रूपये खर्च करण्यात आले आहे. या विषयांच्या अनुषंगाने नगरसेवकांनी शहरातील उद्यानांच्या स्थितीवर लक्ष केंद्रित केले. माजी उपमहापौर अंकुश गावडे यांनी उद्यानांचे संवर्धन म्हणजे नक्की काय असा प्रश्न उपस्थित केला. शहरामध्ये अनेक ठिकाणी दुकानांसमोरील वृक्ष सुकले आहेत. काही ठिकाणी पेट्रोल व इतर इंधन टाकून वृक्ष सुकविण्यात आले आहेत. हे वृक्ष नक्की कशामुळे सुकले याची चौकशी झाली पाहिजे. अनेक ठिकाणी उद्यानांमध्ये वृक्ष सुकले आहेत. खेळण्यांची दुरवस्था झालेली आहे. बैठक व्यवस्थेसाठीचे बाकडे तुटले आहेत. देखभाल करणारा ठेकेदार त्यांची जबाबदारी फक्त वृक्ष संवर्धनाची असल्याचे सांगत असल्याचे निदर्शनास आणून दिले. शिवसेनेचे नगरसेवक नामदेव भगत यांनीही उद्यान विभागामध्ये कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याचे निदर्शनास आणून दिले. उद्यानामध्ये किती माती टाकली, शेणखत किती टाकले याची चौकशी केली पाहिजे. उद्यानांमध्ये होणाऱ्या कामांची देखभाल होत नसल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले.
विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांनीही देखभाल दुरूस्तीचे सर्वसमावेशक कंत्राट काढताना स्थानिक प्रकल्पग्रस्तांवर अन्याय होणार नाही याची काळजी घेण्यात यावी असे मत व्यक्त केले. सीबीडीमधील राष्ट्रवादीचे नगरसेवक अशोक गुरखे यांनी उद्यान विभागामध्ये मोठ्या प्रमाणात कामे होत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. परंतु प्रत्यक्षात होणारी वृक्ष लागवड व संवर्धनासाठी योग्य यंत्रणा नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. धोकादायक वृक्ष तोडण्यासाठी यंत्रसामग्री नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. सानपाडा परिसरामध्ये उद्याने भरपूर आहेत, परंतु त्यामध्ये अत्यावश्यक कामे करण्यासाठी विनंती केल्यानंतरही प्रशासन लक्ष देत नसल्याची नाराजीही व्यक्त केली. घणसोली व नेरूळ पूर्व परिसरात उद्याने निर्माण करण्याची मागणी प्रशांत पाटील व मीरा पाटील यांनी केली. उपआयुक्त तुषार पवार व अतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हाण यांनी सदस्यांनी सुचविलेल्या मुद्यांचा विचार करून आवश्यक त्या उपाययोजना केल्या जातील, असे स्पष्ट केले.