स्मारकाजवळील उद्यानाची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2018 11:30 PM2018-11-24T23:30:28+5:302018-11-24T23:30:46+5:30
राज्य शासनाने रायगड किल्ला संवर्धनासाठी ६०६ कोटी रुपयांचा आराखडा तयार केला असून, प्रत्यक्ष कामांना सुरुवात केली आहे.
नवी मुंबई : पाचाड येथील राजमाता जिजाऊंच्या स्मारकाजवळील उद्यानाची प्रचंड दुरवस्था झाली आहे. उद्यानामध्ये गवत वाढले असून, मुलांसाठी असलेली खेळणीही तुटलेली असल्यामुळे स्मारकाला भेट देण्यासाठी येणाऱ्या नागरिकांनी नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे.
राज्य शासनाने रायगड किल्ला संवर्धनासाठी ६०६ कोटी रुपयांचा आराखडा तयार केला असून, प्रत्यक्ष कामांना सुरुवात केली आहे. रायगड किल्ला, पाचाडचा राजमाता जिजाऊंचा वाडा व इतर कामे केली जाणार आहेत. प्रत्यक्ष कामांना सुरुवात झाली असली तरी सर्व कामे पूर्ण होण्यास खूप कालावधी लागणार आहे. सद्यस्थितीमध्ये पाचाड येथील राजमाता जिजाऊ स्मारकाची देखभाल पुरातत्त्व विभागाकडून केली जात आहे. या ठिकाणी एक कर्मचाºयाची नियुक्तीही केली आहे. समाधीच्या आवारामध्ये दिवसभर नियमित साफसफाई केली जाते. दिवाबत्तीही वेळेवर केली जात आहे. मुख्य प्रवेशद्वारापासून समाधीस्थळापर्यंत साफसफाई केली जाते; पण समाधीच्या बाजूला उभारण्यात आलेल्या उद्यानाची योग्य देखभाल केली जात नाही. उद्यानामध्ये प्रचंड गवत वाढले आहे. बैठक व्यवस्थेसाठीच्या शेडचीही दुरवस्था झाली आहे.
लहान मुलांना खेळण्यासाठी उद्यानामध्ये खेळणी बसविण्यात आली आहेत. समाधीस्थळ पाहण्यासाठी राज्य व देशाच्या कानाकोपºयामधून नागरिक येत असतात. यामध्ये शाळेतील विद्यार्थ्यांची संख्याही मोठी असते. या सर्वांना काही क्षण विरंगुळा मिळावा, यासाठी हे उद्यान बनविण्यात आले आहे; परंतु त्याची देखभाल करण्यासाठी काहीही व्यवस्था केली जात नाही. वाढलेल्या गवतामुळे उद्यानामध्ये जाताही येत नाही. यामुळे शिवभक्त व येथे येणाºया नागरिकांनी नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे.
विधान परिषदेमध्ये उमटले होते पडसाद
राजमाता जिजाऊ स्मारक परिसराची योग्य देखभाल केली जात नसल्याचे पडसाद अनेक वेळा विधान सभा व विधान परिषदेमध्ये उमटले आहेत. मार्च २०१६ मध्ये शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनीही या विषयावर आवाज उठवून समाधीस्थळ व परिसराची योग्य देखभाल केली जावी, अशी मागणी केली होती. शिवप्रेमी नागरीकांनी याविषयी आवाज उठविला होता.
पाचाडमधील राजामाता जिजाऊ समाधीस्थळ हे सर्वांसाठी प्रेरणास्रोत आहे. यामुळे येथे हजारो पर्यटक भेट देण्यासाठी येत असतात. समाधीचे आवार स्वच्छ ठेवले जाते; परंतु बाजूच्या उद्यानाची दुरवस्था झाली असून त्याची योग्य ती देखभाल केली जावी.
- रसिका माने, पर्यटक