सारसोळेमधील उद्यानातील खेळण्यांची झाली दुरवस्था
By admin | Published: April 19, 2017 12:51 AM2017-04-19T00:51:15+5:302017-04-19T00:51:15+5:30
सारसोळे सेक्टर ६ मधील राजमाता जिजाऊ उद्यानातील खेळण्यांची दुरवस्था झाली आहे. तुटलेल्या खेळण्यांमुळे गत आठवड्यात दोन मुले
नवी मुंबई : सारसोळे सेक्टर ६ मधील राजमाता जिजाऊ उद्यानातील खेळण्यांची दुरवस्था झाली आहे. तुटलेल्या खेळण्यांमुळे गत आठवड्यात दोन मुले जखमी झाली आहेत. पालिकेने तत्काळ उपाययोजना केल्या नाही तर आंदोलन छेडण्याचा इशारा नागरिक व लोकप्रतिनिधींनी दिला आहे.
नवी मुंबई महापालिकेने शहरात जवळपास २०० उद्याने तयार केली आहेत. उद्यानांमध्ये मुलांसाठी खेळणी बसविण्यात आली आहेत. पण त्या खेळण्यांची योग्य देखभाल व दुरुस्ती केली जात नाही. सर्वसामान्य नागरिकांची वसाहत असलेल्या परिसरातील उद्यानांची व खेळण्यांची स्थिती अत्यंत बिकट झाली असून यामध्ये सारसोळे सेक्टर ६ मधील राजमाता जिजाऊ उद्यानाचा समावेश आहे. सारसोळे गाव, विस्तारित गावठाण व सिडकोनिर्मित इमारतींमधील नागरिकांसाठी हे एकमेव उद्यान आहे. वास्तविक हे उद्यान फक्त नावापुरतेच शिल्लक आहे. त्याची स्थिती मैदानासारखी झाली आहे. वर्षभरापासून येथील खेळणी तुटली आहेत. झोपाळे गायब झाले आहेत. खेळण्यांचा वापर केल्यास अपघात होवून मुले जखमी होत आहेत. रविवारी गर्दी असल्याने येथे दोन मुले जखमी झाली आहेत. नियमितपणे अशाप्रकारे घटना घडू लागल्या आहेत.
सारसोळेमधील उद्यानाविषयी स्थानिक सामाजिक कार्यकर्ते नीलेश दौंडकर यांनी नगरसेवक सूरज पाटील यांच्याकडे तक्रार केली आहे. पाटील हे स्वत: जवळपास एक वर्षापासून पालिकेच्या अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करत आहेत. १५ दिवसांपूर्वी अधिकाऱ्यांना बोलावून त्यांच्या ही स्थिती निदर्शनास आणून दिली आहे. तत्काळ नवीन खेळणी बसविण्यात यावीत व जोपर्यंत नवीन खेळणी येत नाहीत तोपर्यंत तुटलेली खेळणी हलविण्याची मागणी केली आहे. परंतु पालिका प्रशासन याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे. यामुळे जर पुन्हा कोणी मुलगा खेळताना जखमी झाला तर त्याची पूर्ण जबाबदारी पालिका अधिकाऱ्यांची राहील असा इशारा दिला आहे. (प्रतिनिधी)