नवी मुंबई : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कांदा व लसूणचे दर वाढू लागले आहेत. मुंबई बाजार समितीमध्ये कांदा १६ ते २३ रुपयांना विकला जात असून, किरकोळ मार्केटमध्ये हेच दर ३० रुपयांवर गेले आहेत. होलसेल मार्केटमध्ये लसूण ६० ते १४० रुपयांना विकला जात असून, किरकोळ मार्केटमध्ये हे दर १६० ते २०० रुपयांवर पोहोचले आहेत. मुंबईमध्ये मध्य प्रदेश, राजस्थान मधून लसूणची आवक होत असते. सद्यस्थितीमध्ये प्रति दिन सरासरी १०० टन आवक होत आहे. मागील काही दिवसांपासून लसूणची किंमत वाढू लागली आहे. मे मध्ये होलसेल मार्केटमध्ये ४० ते १०० रुपये किलो दराने लसूण विकला जात होता. सद्यस्थितीमध्ये हेच दर ६० ते १४० झाले आहेत. किरकोळ मार्केटमध्ये हेच दर १६० ते २०० रुपयांवर पोहोचले आहेत. कांद्याचे दरही वाढू लागले आहेत. मे महिन्यात एपीएमसीमध्ये १० ते १५ रुपये किलो दराने कांदा विकला जात होता. सद्यस्थितीमध्ये हेच दर १६ ते २३ रुपयांवर पोहोचले आहेत. किरकोळ मार्केटमध्ये कांदा ३० रुपये किलो दराने विकला जात आहे. पुणे व नाशिक परिसरातून कांद्याची आवक होत आहे. माल खराब होण्याचे प्रमाण जास्त असल्यामुळे कांदा दरात वाढ होत असल्याची माहिती मुंबई बाजार समितीचे संचालक अशोक वाळुंज यांनी दिली.
स्वयंपाकघरातील कांद्यासह लसणाची फोडणी महागली!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 05, 2021 8:19 AM