लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : कोपरी सेक्टर-२६ येथील उड्डाणपुलाजवळ एलपीजी गॅस सिलिंडरने भरलेल्या एका ट्रकला सोमवारी रात्री आग लागली. ट्रकमध्ये अंदाजे ३०० सिलिंडर होते. अग्निशमन दलाने वेळीच आग नियंत्रणात आणल्याने मोठी दुर्घटना टळली. दरम्यान, या आगीत ट्रकचा समोरील भाग जळून खाक झाला आहे. खोपोलीवरून शहरातील गॅस एजन्सीला, खोपोली येथून भरलेल्या सिलिंडरचा पुरवठा केला जातो. सदर ट्रक खोपोलीवरून एपीजीचे भरलेले सिलिंडर घेऊन कोपरीमार्गे वाशीकडे चालला होता. त्यादरम्यान, कोपरी उड्डाणपुलाजवळ ट्रकला अचानक आग लागली. ड्रायव्हरच्या केबिनने पेट घेतल्याने चालकाने गाडी थांबवून क्लीनरसह खाली उडी मारली. या दोघांनीही आग विझविण्याचा प्रयत्न केला; परंतु आग आणखी भडकल्याने अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाच्या पथकाने वेळीच घटनास्थळी येऊन आग आटोक्यात आणली. या ट्रकमध्ये ३00 भरलेले सिलिंडर होते. आग वेळीच नियंत्रणात आल्याने मोठी दुर्घटना टळली. विशेष म्हणजे, जवळच लोकवस्ती आहे. एखाद्या सिलिंडरने पेट घेतला असता, तर मोठा स्फोट झाला असता; परंतु अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळीच आगीवर नियंत्रण मिळविल्याने मोठी दुर्घटना टळली. दरम्यान, आगीचे नेमके कारण अद्यापि समजले नसून, त्यादृष्टीने तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
गॅस सिलिंडरच्या ट्रकला आग
By admin | Published: June 28, 2017 3:33 AM