पनवेलच्या रुग्णालयात ऑक्सिजन टँकमधून गॅसगळती; अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला
By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2021 05:59 AM2021-04-28T05:59:58+5:302021-04-28T06:00:11+5:30
अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला; प्रशासनाकडून तत्काळ दुरुस्ती झाल्याने अनर्थ टळला
कळंबोली : नाशिक येथील झाकीर हुसेन रुग्णालयातील गॅस गळतीची घटना ताजी असतानाच पनवेल उपजिल्हा रुग्णालयातील ऑक्सिजन टॅंकच्या व्हॉल्व्हमधून प्राणवायू गळतीची घटना मंगळवारी चारच्या सुमारास घडली. वेळीच दक्षता घेत उपजिल्हा रुग्णालय प्रशासनाकडून त्वरित दुरुस्तीचे काम हाती घेतल्याने पुढील अनर्थ टळला. या दुरुस्ती काळात रुग्णांना ड्युरावरून ऑक्सिजन पुरवठा देण्यात आला होता. त्यामुळे उपचार करण्यासाठी कोणतीही बाधा आली नसल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच महापालिका अग्निशमन दल, पोलीस यंत्रणा, प्रशासकीय पदाधिकारी दाखल झाले होते. पण तोपर्यंत अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला.
पनवेल शहर तसेच ग्रामीण भागातील कोविड रुग्णांना जीवनदान देणाऱ्या पनवेल उपजिल्हा रुग्णालयात मंगळवारी चारच्या सुमारास ऑक्सिजन टॅंकला जोडलेला व्हॉल्व्ह लिकेज झाल्याने ऑक्सिजन गळती झाली. वैद्यकीय उपचारादरम्यान ऑक्सिजन पुरवठा पुरेसा राहावा याकरिता उपजिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन प्लांट तयार करण्यात आला आहे. या ऑक्सिजन प्लांटच्या सुरक्षेसाठी तीन कर्मचारी नेमण्यात आले आहेत.
त्रिस्तरीय सुरक्षा असल्याने वेळीच वायू गळती होत असल्याचे लक्षात आले. त्याचवेळी ड्युरावरून रुग्णांना ऑक्सिजन पुरवठा सुरू करण्यात आला. त्यामुळे रुग्णांच्या ऑक्सिजन पुरवठ्यावर कोणताही परिणाम झाला नाही. उपजिल्हा रुग्णालयात १५० रुग्ण उपचार घेत आहेत. ऑक्सिजन गळती झाल्याची माहिती मिळताच जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी रुग्णालयाला भेट दिली. त्याचबरोबर पनवेल महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख, तहसीलदार विजय तळेकर, प्रांत अधिकारी दत्तात्रय नवले यांनी उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतली.