- अजय परचुरे/भालचंद्र जुमलेदार
पनवेल- रसायनी इथल्या पाताळगंगा परिसरात असलेल्या हिंदुस्थान ऑर्गेनिक केमिकल कंपनीतून मोठ्या प्रमाणात वायुगळती झाली आहे. बुधवारी रात्री 9.45 वाजताच्या सुमारास ही घडना घडली असून, या वायुगळतीमुळे 28 वानरांसह 48 माकडं मृत्युमुखी पडली आहेत. तर 100हून अधिक पक्षी गतप्राण झाले आहेत.हिंदुस्थान ऑर्गेनिक केमिकल(एचओसी) कंपनी ही इस्रोसाठी इंधन निर्मितीचं काम करते. 13 डिसेंबरला म्हणजेच बुधवारी रात्री 9.45 वाजताच्या सुमारास या कंपनीच्या इंधनाच्या टाकीतून ही वायुगळती सुरू झाली. या वायुगळतीचा आजूबाजूच्या परिसरातील असंख्य पशू-पक्ष्यांना फटका बसला. तसेच या वायुगळतीमुळे कंपनीतले दोन वॉचमनही बेशुद्ध झाले होते. त्यानंतर कंपनी बंद करण्यात आली असून, सध्या तरी कंपनीचा एक प्लांट सुरू आहे.28 वानरांसह 48 मृत्युमुखी पडलेल्या माकडांचा एचओसी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी कोणालाही थांगपत्ता न लागू देता विल्हेवाट लावली आहे. या घटनेनं प्राणी मित्रांमधून प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. तसेच रसायनीच्या जवळपास कर्नाळा अभयारण्य असल्यानं या वायुगळतीमुळे वन्यजीवांच्या अधिवासाला धोका निर्माण झाला आहे.
वनविभागाकडून लोकमतच्या वृत्ताची दखल...वनविभागाकडून लोकमतच्या वृत्ताची दखल घेण्यात आली आहे. या घटनेबाबत वनअधिकाऱ्यांनी आपला तपास सुरू केला आहे. ज्या ठिकाणी माकडं आणि पक्षी पुरण्यात आले आहेत. त्या ठिकाणी खोदकाम करण्याचे काम वनधिकारी टीमकडून सुरू आहे. तसेच, पुरलेले प्राणी काढल्यानंतर त्यांचा रीतसर पंचनामा करून घेण्यासाठी पशुवैद्यकीय अधिकाऱ्याला पाचारण करण्यात आले आहे. याचबरोबर, कंपनीच्या गेट समोर स्थानिक पोलीसांचा बंदोबस्त करण्यात आला आहे.