रक्तचंदन तस्करीत वाढ

By Admin | Published: July 11, 2015 03:38 AM2015-07-11T03:38:22+5:302015-07-11T03:38:22+5:30

गेल्या काही वर्षात उरण जेएनपीटी परिसरात रक्तचंदन तस्करीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. कर्नाटक, आंध्र, उत्तर प्रदेशातील काही भागातून जेएनपीटी बंदरातून मोठ्या प्रमाणात होत

Gastrointestinal tract increase | रक्तचंदन तस्करीत वाढ

रक्तचंदन तस्करीत वाढ

googlenewsNext

मधुकर ठाकूर, उरण
गेल्या काही वर्षात उरण जेएनपीटी परिसरात रक्तचंदन तस्करीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. कर्नाटक, आंध्र, उत्तर प्रदेशातील काही भागातून जेएनपीटी बंदरातून मोठ्या प्रमाणात होत असलेल्या रक्तचंदनाच्या तस्करीमुळे बंदर संघटित रक्तचंदन माफियांच्या विळख्यात सापडले आहे. कस्टम, पोलीस, वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मागील आठ वर्षांत विविध ठिकाणी आणि काही कंटेनर गोदामांवर धाडी टाकून ६५६.५७७ मे. टनापेक्षा अधिक रक्तचंदनाचा साठा जप्त केला आहे. जप्त केलेल्या या रक्तचंदनाची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत किंमत अब्जावधी रुपये आहे. याप्रकरणी आरोपींना अटक करण्यात सुरक्षा यंत्रणेला यश आले असले तरी त्यांची संख्या नगण्य आहे. शिवाय मुख्य सूत्रधारांपर्यंत अद्याप तरी सुरक्षा यंत्रणेचे हात पोहोचलेले नाहीत. परिणामी मुख्य
सूत्रधार मोकाटच असल्याने रक्तचंदनाची जेएनपीटी बंदरातून मोठ्या प्रमाणात तस्करी सुरूच आहेत.
जेएनपीटी बंदरातून याआधी शस्त्रास्त्रे, अमली पदार्थ, सापाची कातडी मोठ्या प्रमाणात तस्करी होत होती. चार-पाच वर्षांपासून आता तस्करीमध्ये रक्तचंदनाची भर पडली आहे. परदेशात प्रामुख्याने चीन, मलेशिया, जपान, सिंगापूर आणि आशिया खंडातून भारतातील रक्तचंदनाला मोठी मागणी आहे. लाकडी कलाकुसरीची घरे, घरातील सुबक फर्निचर आणि इतर तत्सम कामांसाठी रक्तचंदनाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. रक्तचंदनाच्या लाकडामुळे घरातील वातावरण सातत्याने थंड राहते. तसेच लाकडापासून सुबक आणि टिकाऊ फर्निचर तयार होत असल्याने या रक्तचंदनाच्या लाकडाला परदेशात मोठी मागणी आहे.
भारतात कर्नाटक, आंध्र, उत्तर प्रदेशातील काही भागातील जंगलात रक्तचंदनाची लागवड केली जाते. फारच महागडे असल्याचे भारतात रक्तचंदनाच्या लाकडाचा उपयोग गर्भश्रीमंत करतात. देशात या दुर्मीळ रक्तचंदनाच्या एका किलोची किंमत साधारणत: तीन ते चार हजार रुपयापर्यंत आकारली जाते, तर परदेशात रक्तचंदन १५० डॉलर प्रतिकिलोच्या भावाने विकले जाते. परदेशात रक्तचंदनाच्या लाकडाला मिळणाऱ्या प्रचंड भावामुळे आंतरराष्ट्रीय संघटित माफियांनी रक्तचंदनाच्या तस्करीकडे आपला मोर्चा वळविला आहे. त्यामुळे रक्तचंदनाच्या तस्करीसाठी आता जेएनपीटी बंदराचा वापर मोठ्या प्रमाणात होऊ लागल्याचे मागील आठ वर्षांतील अनेक घटनांमुळे उघडकीस येऊ लागले असून मूळ आरोपी पोलिसांच्या हाती आलेले नाहीत.

Web Title: Gastrointestinal tract increase

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.