कळंबोली : पनवेल-मुंब्रा महामार्गावरील सबवेला गटाराचे स्वरूप प्राप्त झाले आहे. नावडे येथील सबवे पूर्णपणे बुजवण्यात आला आहे. त्यात कचरा तसेच सांडपाणी सोडले जात आहेत. भुयारी मार्ग बंद असल्याने गावकरी महामार्ग ओलांडताना लहान-मोठे अपघात घडत आहेत. याविषयी महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाकडून कोणतीही उपाययोजना केली जात नसल्याचे दिसून येत आहे.
पनवेल -मुंब्रा महामार्ग क्रमांक ४ असून या महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतुकीची वर्दळ आहे. या मार्गावरून बाहेरच्या राज्यातून अवजड वाहने ये-जा करतात. कळंबोली येथील स्टील मार्केट, जेएनपीटी तसेच पुणे येथे जाणारी वाहने सुध्दा याच महामार्गाचा वापर करतात. दहा वर्षांपूर्वी या महामार्गाचे रुंदीकरण करण्यात आले. त्यावेळी महामार्गालगत असलेल्या नावडे, खुटारी, रोहिंजन या गावाकरिता जाण्या-येण्यासाठी सबवे तयार करण्यात आला. काही दिवस गावकऱ्यांनी या भुयारी मार्गाचा वापर केला. परंतु गेल्या चार वर्षांपासून मार्ग बंद पडल्याने महामार्ग ओलांडावा लागतो. यात मोठ्या प्रमाणात अपघात होतात तर कित्येक रहिवाशांचे बळी सुध्दा गेले आहेत.
रोहिंजन येथील भुयारी मार्गात गटाराचे स्वरूप आले आहे. आतमध्ये पाणी साचल्याने डास आणि दुर्गंधी सुटली आहे. नागरिकांना या सबवेचा वापर न होता बॅनरबाजीसाठी उपयोग केला जातो. एमएसआरडीसीने पूर्णपणे दुर्लक्ष केल्यामुळे ही परिस्थिती उद्भभवली असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
गेली दोन वर्षांपासून रस्ते विकास महामंडळाने याकडे दुर्लक्षित केले आहे. भुयारी मार्गाकरिता वारंवार तक्रारी करुन सुध्दा एमएसआरडीसीने कोणत्याच उपाययोजना केल्या नाहीत. या मार्गावर टोलवसुली केली जाते. तर मग सुविधा का दिल्या जात नाहीत असा प्रश्न स्थानिक नगरसेवक अरविंद म्हात्रे यांनी उपस्थित केला आहे.
पाहणी झाली तरी उपाययोजना नाहीतच्एमएसआरडीसीच्या कार्यकारी अभियंता नम्रता रेड्डी यांनी सहा महिन्याअगोदर पनवेल-मुंब्रा महामार्गाचा पाहणी दौरा केला. यात गावकऱ्यांना येणाºया अडचणी जाणून घेतल्या. याबाबत उपाययोजना करण्याची ग्वाही यावेळी दिली. परंतु अद्याप याबाबत कोणत्याही हालचाली करण्यात आल्या नाहीत.
मुंब्रा महामार्गावरील असलेल्या भुयारी मार्ग लवकरच सुरू करण्यात येईल. आतील पाणी काढून ते स्वच्छ केले जाईल. याबाबत लवकरच कामाला सुरुवात करून सबवे नागरिकांसाठी खुले केले जाईल.-नम्रता रेड्डी,कार्यकारी अभियंतामहाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ