शहरात पे अॅण्ड पार्किंगचे गौडबंगाल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2019 11:51 PM2019-07-14T23:51:41+5:302019-07-14T23:52:05+5:30
पार्किंगचे योग्य नियोजन न केले गेल्याने पे अॅण्ड पार्किंगचे भूत शहरवासीयांच्या मानगुटीवर बसविण्यात आले आहे.
नवी मुंबई : शहरात पार्किंगचा बोजवारा उडाला आहे. पार्किंगचे योग्य नियोजन न केले गेल्याने पे अॅण्ड पार्किंगचे भूत शहरवासीयांच्या मानगुटीवर बसविण्यात आले आहे. गरज नसतानाही अनेक ठिकाणी पे अॅण्ड पार्किंग सुरू करण्यात आले आहे, तर काही ठिकाणी विनापरवानाच पार्किंगची वसुली सुरू करण्यात आली आहे. पे अॅण्ड पार्किंगच्या या गौडबंगालमुळे वाहनधारक चक्रावून गेले आहेत. या प्रकाराला महापालिकेतील संबंधित अधिकाऱ्यांसह स्थानिक लोकप्रतिनिधींचा अर्थपूर्ण समझोता कारणीभूत असल्याचा आरोप शहरवासीयांकडून केला जात आहे.
मुंबई महापालिकेने पार्किंगचा विषय गांभीर्याने घेत काही धाडसी निर्णय घेतले आहेत. बेकायदा पार्किंगला आळा घालण्यासाठी दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला आहे. शहरातील अधिकृत वाहनतळाचा वापर वाढावा म्हणून ठोस मोहीम सुरू करण्यात आली आहे. मुंबईच्या तुलनेत नवी मुंबई सुनियोजित शहर असले तरी येथे पार्किंगचे नियोजन पूर्णत: फसले आहे. या प्रश्नावर तोडगा काढण्यात प्रशासनाला मागील २० वर्षांत यश आलेले नाही. याचा परिणाम म्हणून दिवसागणिक हा प्रश्न जटील होताना दिसत आहे. वाहनधारकांसाठी डोकेदुखीचा ठरलेल्या या प्रश्नांवर तात्पुरता तोडगा म्हणून महापालिकेने शहरात ठिकठिकाणी पे अॅण्ड पार्किंगचे नियोजन केले आहे. त्यासाठी ठेकेदाराची नेमणूक करण्यात आली आहे. नियमानुसार महापालिकेने ठरवून दिलेले शुल्क आकारणे संबंधित ठेकेदारांना बंधनकारक आहे; परंतु अनेक ठेकेदार मनमानी पद्धतीने शुल्क आकारणी करीत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत, त्यामुळे पे अॅण्ड पार्किंगच्या विरोधात शहरवासीयांत नाराजीचे सूर दिसू लागले आहेत.
नो पार्किंग, पे अॅण्ड पार्किंग किंवा सम-विषम पार्किंगचे धोरण आखताना वाहतूक विभागाचे निकष ठरलेले असतात. पे अॅण्ड पार्किंग किंवा नो पार्किंग सुरू करण्यापूर्वी संबंधित विभागातील नागरिकांकडून हरकती मागविल्या जातात. त्यानंतरच त्याची अंमलबजावणी केली जाते. या नियमांना हरताळ फासत कोणतीही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण न करता वाटेल तेथे मनमानी पद्धतीने पे अॅण्ड पार्किंग सुरू केले जात आहे. अशाप्रकारचे अनेक पे अॅण्ड पार्किंग शहरात बेमालूमपणे सुरू असल्याचे दिसून आले आहे. एपीएमसी, वाशी, सानपाडा, नेरुळ, सीबीडी या विभागातील काही रस्त्यांवर रातोरात पे अॅण्ड पार्किंगचे बेकायदा फलक लावून शुल्क वसुली सुरू केल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे, ज्या ठिकाणी अधिकृत ठेकेदार नेमले आहेत, त्या ठिकाणी ठेकेदाराचे नाव, पार्किंग शुल्काचा तपशील असलेला महापालिकेचा फलक प्रदर्शनीय ठिकाणी लावणे बंधनकारक आहे. मात्र, अलीकडेच सुरू झालेल्या शुल्क वसुलीच्या ठिकाणी केवळ पे अॅण्ड पार्किंगचे फलक लावल्याचे पाहावयास मिळते. कोणत्याही कायदेशीर बाबीची पूर्तता न करता केवळ ठेकेदाराची गरज म्हणून सुरू करण्यात आलेल्या पे अॅण्ड पार्कचे गौडबंगाल वाहनधारकांसाठी बुचकाळ्यात टाकणारे ठरले आहे.
>पे अॅण्ड पार्क शुल्क माफ होणार?
पे अॅण्ड पार्क बाबत वाढत्या तक्रारी त्यामुळे वाहनधारकांची होणारी गैरसोय पाहता शहरातील पे अॅण्ड पार्क शुल्क माफ करण्याचे सूतोवाच केले आहे. सत्ताधाऱ्यांच्या या निर्णयाबाबत शहरवासीयांतून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. सरसकट सर्वचे वाहनतळ मोफत केले तर वाहतुकीचे नियोजन कोलमडेल. त्यामुळे वाहतूक पोलिसांची डोकेदुखी वाढेल. तसेच अधिकृत पे अॅण्ड पार्क करणाºया अनेक कर्मचाºयांच्या रोजगारावर गदा येईल. सत्ताधारी राष्ट्रवादीने या सर्व शक्यतांची पडताळणी करून निर्णय घ्यावा, असे जाणकारांचे मत आहे. त्याचबरोबर गरज नसलेल्या ठिकाणी सुरू करण्यात आलेले पे अॅण्ड पार्किंग बंद करावेत. महापालिकेचे फलक लावून विनापरवाना पार्किंग शुल्क वसूल करणाºयांवर कारवाई करावी, अशी मागणी शहरवासीयांकडून करण्यात येत आहे.
>महापौरांनी दिले कारवाईचे संकेत
पे अॅण्ड पार्किंगमध्ये होणाºया अनियमित प्रकाराबाबत चौकशी करून कठोर कारवाई करण्याचे संकेत महापौर जयवंत सुतार यांनी दिले आहेत. मात्र, विनापरवाना सुरू असलेल्या पे अॅण्ड पार्कवर प्रशासन काय कारवाई करणार याबाबत शहरवासीयांत उत्सुकता लागून राहिली आहे.