नवी मुंबई : नवी मुंबईसह पनवेल परिसरात गौरी-गणपतीला भावपूर्ण निरोप देण्यात आला. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, अशा जयघोषात आपल्या लाडक्या बाप्पासह गौरीचे विसर्जन करण्यात आले. नवी मुंबई महापालिका क्षेत्रात सायंकाळी ८ वाजेपर्यंत २८४१ गौरी-गणपतीचे विसर्जन करण्यात आले. तर पनवेल महापालिका क्षेत्रातील दुपारनंतर गौरी-गणपतीचे भावपूर्ण विसर्जन करण्यात आले.गौरी-गणपती विसर्जनाला दुपारनंतर सुरु वात झाली. पावसाने विश्रांती घेतल्यामुळे वाजतगाजत बाप्पाची मिरवणूक काढण्यात आली. रात्री उशिरापर्यंत गणपती विसर्जन सुरू होते. विसर्जनासाठी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. १00 पोलीस अधिकारी व ४५0 पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होते. तसेच विसर्जनासाठी वाहतूक व्यवस्थेतही बदल करण्यात आली होती. प्रत्येक विसर्जन तलावांजवळ महापालिकेच्या स्वयंसेवक तैनात करण्यात आले होते. त्याचप्रमाणे महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारीही उपस्थित होते.महापालिका क्षेत्रातील २३ तलावावंर रात्री उशिरापर्यंत विसर्जन सुरू होते. दिवाळे कोळीवाडा, घणसोली, वाशी, कोपरखैरणे, आणि दिघा तलावांवर भाविकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. संध्याकाळी ४ वाजल्यानंतर गणपती विसर्जनाला सुरुवात झाली. ढोल-ताशांच्या गजरात फटाक्यांची आतषबाजी करीत प्रचंड उत्साहात; परंतु तितक्याच भावपूर्ण वातावरणात गौरी-गणपतीला निरोप देण्यात आला.पोलिसांनी वाहतुकीचे उत्तम नियोजन केले होते. महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांच्या आदेशानुसार महापालिकेचे सर्व विभाग अधिकारी सकाळपासून विसर्जन तलावावर उपस्थित होते.ढोल-ताशांचा गजर; फटाक्यांची आतशबाजीपनवेल शहरासह ग्रामीण भागात गौरी-गणपतीला भावपूर्ण निरोप देण्यात आला. महापालिकेच्या वतीने विसर्जनस्थळांवर विशेष सुविधा उपलब्ध करण्यात आल्या होत्या. पाच दिवसांच्या गणपतीसह गौरीचेही विसर्जन करण्यात आले.सोमवारी पाच दिवसांच्या गणपतीला निरोप देण्यात आला. यात घरगुती गणपती डोक्यावर घेऊन, तर कित्येकांनी खासगी गाड्यांतून जयघोष करीत बाप्पाची मिरवणूक काढली.या मिरवणुकीत लहान मुलांसह, महिला, पुरु ष, प्रौढांनीही सहभाग घेतला होता. संपूर्ण पनवेल परिसरात श्रींच्या मिरवणुका निघाल्या होत्या. गुलालाची उधळण करत, तालुक्यातील गावांमध्ये गाढी नदीमध्ये गौराई व गणपतीचे विसर्जन करण्यात आले.पालिका हद्दीत ठिकठिकाणच्या तलावात, कोळीवाडा-गाढी नदी, पनवेल बंदर, वडाले तलाव, तक्का, पोदी, आदई तलाव, सुकापूर, खिडूकपाडा स्टील मार्केट, खांदेश्वर शिव मंदिर आदी ठिकाणी विसर्जन करण्यात आले.उरणमध्ये विसर्जन घाटावर भक्तांचे स्वागततालुक्यातील शहरी आणि ग्रामीण भागात गौरी-गणपती विसर्जन करण्यात आले. उरण शहरातून सुमारे ५५० घरगुती गणपती व गौरीचे उनपच्या विमला तलावात विसर्जन करण्यात आले. उरण नगरपरिषदेकडून गणपती विसर्जन दरम्यान संपूर्ण विमला तलावाला विद्युत रोषणाई करून विसर्जनासाठी येणाऱ्यांसाठी स्वागताची जय्यत तयारी केली होती.ग्रामीण भागातील अनेक गणेशमूर्तींचे विसर्जन केगाव हद्दीतील माणकेश्वर दांडा समुद्रकिनारा, पीरवाडी समुद्रात करण्यात आले. माणकेश्वर दांडा, पीरवाडी समुद्रात दुपारी ३ वाजल्यापासून गणेश विसर्जनाला सुरुवात झाली होती. गणेश विसर्जनासाठी आणि विसर्जनाचा सोहळा पाहण्यासाठी माणकेश्वर दांडा, पीरवाडी येथे मोठी गर्दी झाली होती.मोरा सागरी पोलीसठाण्याच्या हद्दीतील पाच दिवसांच्या गौरी-गणेशमूर्तींचे भवरा तलाव, घारापुरी तलाव, मोरा समुद्रात मोठ्या उत्साहात विसर्जन करण्यात आले. जेएनपीटी, तसेच तालुक्यातील ग्रामीण भागातील अनेक गणेशमूर्तींचे गाव तलावात विसर्जन करण्यात आले.परिसरात सर्वत्र एसीपी विठ्ठल दामुगडे यांच्या मार्गदर्शनाखाली न्हावा-शेवा पोलीस ठाण्याच्या वपोनि चेतन काकडे, उरण पोलीसठाण्याचे वपोनि निवृत्ती कोल्हटकर, मोरा सागरी पोलीसठाण्याचे वपोनि माणिक नलावडे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. विसर्जन दरम्यान कुठेही अनुचित प्रकार घडला नसल्याने विसर्जन सोहळा शांततेत पार पडल्याची माहिती पोलिसांनी दिली.
गौरी-गणपतीला भावपूर्ण निरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2018 4:28 AM