गौतम नवलखांची सुटका, पण आग्रोळीत राहणार नजरकैदेत
By मनोज ताजने | Updated: November 19, 2022 19:19 IST2022-11-19T19:03:16+5:302022-11-19T19:19:19+5:30
सीपीएमच्या बी. टी. रणदिवे वाचनालयात घेणार आसरा

गौतम नवलखांची सुटका, पण आग्रोळीत राहणार नजरकैदेत
नारायण जाधव
नवी मुंबई : नागरी हक्क कार्यकर्ते, भीमा कोरेगाव प्रकरणातील आरोपी गौतम नवलखा यांना कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सवादी)च्या बेलापूरनजीकच्या आग्रोळी गावातील कॉम्रेड बी. टी. रणदिवे वाचनालयाच्या इमारतीत नजरकैदेत ठेवण्यात येणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने त्यांची २४ तासांत सुटका करण्याचे आदेश दिले होते. त्यांना नजरकैदेत ठेवण्यासाठी सीपीएमने आपले वाचनालय देण्याची दर्शविल्याने त्यांना शनिवारी संध्याकाळी आग्रोळीत आणले. ही इमारत दुमजली असून तळमजल्यावर सीपीएम पार्टीचे बीटी रणदिवे स्मृती ट्रस्ट वाचनालय आहे. त्याच्या पहिल्या मजल्यावरील हॉलमध्ये गौतम नवलखांना एका महिन्यासाठी ठेवण्यात येणार आहे.
या वाचनालयामध्ये कथा कादंबऱ्या, वेगवेगळ्या विषयांची पुस्तके जनरल नॉलेज संदर्भातील इतर पुस्तके उपलब्ध असून ह्या लायब्ररीमध्ये सकाळी १० च्या सुमारास ते दुपारी बारापर्यंत वाचकांची गर्दी असते. तसेच जास्तीतजास्त वाचक हे पुस्तक बदली करण्यासाठी येतात. वाचनालयास तीन गेट असून दोन गेटचा वापर केला जातो. त्यामुळे ग्रंथालय आणि पहिल्या मजल्याचा काहीही संबंध येणार नाही, असे सांगण्यात आले. वरच्या मजल्यावर जाण्यासाठी असलेला मुख्य दरवाजा आणि गेट एनआयए सील करण्यात येणार आहे. (सध्या गेट बंद आहे) त्यामुळे ग्रंथालय आणि वरच्या मजल्याचा काहीही संबंध येणार नाही. तसेच पहिल्या मजल्यावर मोठा हॉल असून एक टॉयलेट, एक बाथरूम आहे. संपूर्ण हॉलमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावले असून मुख्य गेट बंद करून गेटच्या बाहेरदेखील सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. तर इमारतीचे नाव कागदी ताडपत्रीने झाकले असून नवलाखांना इथे का ठेवण्यात येत आहे, याबद्दल काहीही माहिती नसल्याचे स्थानिक रहिवाशांनी सांगितले.