नवी मुंबई : नवी मुंबईमधील गवळीदेव व सुलाईदेवी डोंगरांच्या ठिकाणी पर्यटन स्थळ उभारण्याच्या हेतूने मंगळवारी सकाळी खासदार राजन विचारे यांनी परिसराचा पाहणी दौरा केला.यावेळी खासदार राजन विचारे, नवी मुंबई महापालिका आयुक्त अभिजीत बांगर, मुख्य वन संरक्षक नरेश झुरमुरे, शिवसेना जिल्हाप्रमुख द्वारकानाथ भोईर, नवी मुंबई महापालिका मुख्य अभियंता सुरेंद्र पाटील, घणसोली विभाग अधिकारी महेंद्रसिंग ठोके, उप वन संरक्षक गजेंद्र हिरे, सहायक उप वन संरक्षक गिरिजा देसाई, वन क्षेत्र अधिकारी नरेंद्र मुठे आदी उपस्थित होते.या परिसराच्या विकासासाठी खासदार राजन विचारे मागील काही वर्षांपासून पाठपुरावा करत आहेत. यासाठी वेळोवेळी वन विभाग व महानगरपालिका आयुक्त यांच्याशी पत्रव्यवहार व बैठका घेऊन चर्चा केली, परंतु निधीअभावी व वन विभागाकडे आराखडा तयार नसल्यामुळे अद्याप सदर ठिकाणचा पाहिजे तसा विकास झालेला नाही. यासाठी या दोन ठिकाणी पर्यटन स्थळ उभारण्याच्या हेतूने मंगळवारी सकाळी गवळीदेव डोंगर आणि सुलाईदेवी परिसराचा पाहणी दौरा करण्यात आला.नवी मुंबईतील घणसोली येथील एकमेव नैसर्गिक पर्यटन स्थळाच्या गवळीदेव, सुलाईदेवी या दोन डोंगरांच्या विकास वन विभागाकडून करण्यात येणार होता. वन विभागाकडे निधी नसल्याने नवी मुंबई महानगरपालिकेने या पर्यटन स्थळांसाठी वन विभागाला २०१४ साली एक कोटीचा निधी दिला होता. मात्र, काही तांत्रिक कारणामुळे पर्यटन स्थळाच्या कामाला सुरुवात झाली नाही. मफतलाल समूहाच्या नोसिल कंपनीने हा डोंगर भाडेपट्ट्याने घेऊन विकसित केला असून, त्या ठिकाणी पाच लाख झाडांचे संवर्धन केले होते, परंतु नोसिल कंपनी बंद पडल्यानंतर या डोंगराची वाताहत झाली. नवी मुंबई कार्यक्षेत्रातील या डोंगराचा विकास करायचा असेल, तर वन विभागाला निधी द्या. त्यानुसार, वन विभाग खर्च करेल, असे वन विभागाने पालिकेला कळविले.
नवी मुंबईकर आकर्षित होतातगवळीदेव व सुलाईदेवी डोंगरावर अनेक जुनी झाडे आहेत. परिसरात औषधी झाडांचा समावेश आहे. त्यामुळे या परिसरात गर्द वनराई विविध पक्षी, सरडे, विविध कीटक, फुलपाखरे आहेत. तिथे पावसाळ्यात माथेरान, महाबळेश्वरसारखेच वातावरण असते. दोन ते तीन धबधब्यांमुळे नवी मुंबईकर गवळी देव डोंगराकडे आकर्षित होतात, तसेच गिर्यारोहक, पर्यावरण व पक्षीप्रेमी विविध प्रकारच्या माहितीसाठी या स्थळाला भेट देत असतात.