नामदेव मोरे।लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : स्मार्ट सिटीमधील प्रमुख पर्यटन स्थळ असलेल्या गवळीदेव धबधबा परिसराची दुरवस्था झाली आहे. मद्यपींचा वावर वाढला असून, सर्वत्र दारूच्या बाटल्यांचा खच पाहावयास मिळत आहे. पर्यटकांच्या सुविधेसाठी तयार केलेल्या दोन्ही ठिकाणच्या प्रसाधनगृहांची व माहिती फलकांचीही मोडतोड करण्यात आली आहे. वनविभाग, महानगरपालिका व पोलीस प्रशासनानेही सुरक्षेसाठी काहीही सुविधा केलेली नाही.नवी मुंबईमधील एकमेव सुरक्षित व सुस्थितीमध्ये असलेल्या पर्यटन स्थळांमध्ये गवळीदेव धबधबा परिसराचा समावेश होतो. पांडवकडा प्रमाणे येथे अपघात होत नसल्यामुळे मुंबई, ठाणे, नवी मुंबई परिसरातील हजारो पर्यटक येथे येत असतात. ऐरोलीचे माजी आमदार संदीप नाईक, घणसोलीमधील तरुणाई व वनविभागानेही या परिसराचा विकास करण्यासाठी पाठपुरावा केला आहे. सर्वांच्या पाठपुराव्याला यश येऊन वनविभागाने धबधब्याकडे जाणारी पायवाट व्यवस्थित केली होती. सर्वत्र पक्षांची माहिती देणारे फलक लावण्यात आले होते. पर्यटकांना बसण्यासाठी लागडी निवारा शेड तयार केले होते, परंतु येथे सुरक्षेसाठी काहीही व्यवस्था केली नाही. परिणामी, धबधबा परिसराची दुरवस्था झाली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतरही प्रत्येक रविवारी जवळपास दोन हजार पर्यटक या परिसराला भेटी देत आहेत. इतर दिवशीही अनेक पर्यटक जात असतात, परंतु येथील अवस्था पाहून व्यथित होऊन परत यावे लागत आहे.धबधबा परिसरात मद्यपींचा अड्डा बनला आहे. बिनधास्तपणे अनेक तरुण मद्यपान करत असतात. मोकळ्या बाटल्या जागा मिळेल, तेथे टाकून दिल्या जातात. बाटल्यांचा खच ठिकठिकाणी पाहावयास मिळत आहे. निवारा शेडचा वापर खाद्यपदार्थ शिजवण्यासाठी केला जात आहे.सुरक्षा व्यवस्था नाही : गवळी देव परिसरामध्ये वनविभागाने सुरक्षेसाठी कर्मचाऱ्यांची व्यवस्था केलेली नाही. यामुळे मद्यपान करणारे बिनधास्तपणे दिवसभर ठाण मांडून बसलेले असतात. नवी मुंबईमधील व बाहेरील पर्यटकही सहकुटुंब येथे येत असतात. मद्यपींना पाहून पर्यटक नाराजी व्यक्त करू लागले आहेत. पोलीसही गस्त घालत नसल्यामुळे व मद्यपींवर कारवाई करत नसल्यामुळे पर्यटकांनी नाराजी व्यक्त केली आहे.गवळीदेव धबधबा परिसरात सहकुटुंब भटकंतीसाठी आलो होतो. मंदिराजवळच मद्यपींचा अड्डा तयार झाल्याचे पहावयास मिळाले. सर्वत्र बाटल्यांचा खच पाहिल्यानंतर कौटुंबिक सहलीसाठी येथे यायचे की नाही, असा प्रश्न पडला आहे.- संजय शिंदे, रहिवासी नेरूळआम्ही प्रत्येक वर्षी गवळीदेव परिसरात पावसाळी पर्यटनासाठी येतो. गतवर्षी येथे उत्तम सुविधा होत्या. या वर्षी प्रसाधनगृहाची दुरवस्था झाली आहे. माहिती फलक तुटलेले आहेत. सुरक्षेसाठीही काहीच उपाययोजना दिसल्या नाहीत.- शितल पवार, रहिवासी कोपरखैरणे
गवळीदेव परिसरही बनला मद्यपींचा अड्डा; नागरिक त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2020 12:26 AM