गोंधळामुळे गाजली विशेष सभा
By admin | Published: August 26, 2015 12:43 AM2015-08-26T00:43:35+5:302015-08-26T00:43:35+5:30
नवी मुंबई महापालिकेच्या आर्थिक स्थितीवर चर्चा करण्यासाठी आयोजित विशेष सर्वसाधारण सभा गोंधळामुळे गाजली. सत्ताधारी व विरोधकांनी एकमेकांवर आरोप- प्रत्यारोप केले
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या आर्थिक स्थितीवर चर्चा करण्यासाठी आयोजित विशेष सर्वसाधारण सभा गोंधळामुळे गाजली. सत्ताधारी व विरोधकांनी एकमेकांवर आरोप- प्रत्यारोप केले. गोंधळामुळे दोन तास कामकाज ठप्प झाले होते. रात्री बारा वाजेपर्यंत सभेचे कामकाज सुरू होते.
शासनाने एलबीटी रद्द केल्यामुळे महापालिकेला मोठा फटका बसला आहे. आर्थिक स्थितीवर चर्चा करण्यासाठी दोन दिवस विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन केले होते. पहिल्या दिवशी शिवसेना नगरसेवकांनी सत्ताधारी राष्ट्रवादीवर टीका केली होती. दुसऱ्या दिवशी राष्ट्रवादीच्या सदस्यांनी विरोधकांवर पलटवार केला. ज्येष्ठ नगरसेवक अनंत सुतार यांनी विरोधकांचे आरोप खोडून काढले. सर्वांना अभिमान वाटावा असे महापालिकेचे काम सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गणेश म्हात्रे यांनी पालिकेत अतिक्रमण घोटाळा झाला असल्याचे निदर्शनास आणून दिले. यामुळे शिवसेनेचे एम. के. मढवी संतप्त झाले. त्यांनी आमदार संदीप नाईकांवर टिप्पणी केली. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक आक्रमक झाले. मढवी यांनी माफी मागावी, अशी मागणी केली. नेत्रा शिर्के, सुजाता पाटील यांनी नेत्यांवरील आरोप खपवून घेतले जाणार नसल्याचे सांगितले. कोणत्याही स्थितीमध्ये माफी मागावी, अन्यथा आम्ही त्यांच्या नेत्यांविषयी बोलू, असे स्पष्ट केले. त्यामुळे सभागृहात दोन तास कामकाज ठप्प झाले. अखेर दोन तासांनंतर कामकाज पुन्हा सुरू झाले.
राष्ट्रवादीच्या नगरसेविका दिव्या गायकवाड यांनी मालमत्ता कर विभागाचे उत्पन्न वाढले. तेथील अनागोंदी कारभार थांबविण्याची मागणी केली. उत्पन्नाचे विविध मार्ग त्यांनी सुचवले. नेत्रा शिर्के, अपर्णा गवते, सूरज पाटील यांनी महापालिकेच्या चांगल्या कामाची पुस्ती जोडली.
महापालिकेच्या सद्य परिस्थितीविषयी वास्तव माहिती सर्वांसमोर यावी यासाठी सभेचे आयोजन केले म्हणून स्पील ओव्हर आले असल्याचे सांगितले.
(प्रतिनिधी)
विरोधकांचा सभात्याग
सभागृह नेते जयवंत सुतार यांनी विरोधकांचे मुद्दे खोडून काढल्यानंतर विरोधकांनी सभात्याग केला. विरोधी पक्षाला सत्य पचत नसल्याने त्यांनी पळ काढल्याचा आरोप सभागृह नेत्यांनी केला. आरोप करायचे पण स्पष्टीकरण ऐकण्याची ताकद नसल्याचे सांगितले. अर्धा तासानंतर सभात्याग गेलेले विरोधक पुन्हा कामकाजात सहभागी झाले.
भ्रष्टाचाराचे आरोप तथ्यहीन
सभागृह नेते जयवंत सुतार यांनी विरोधी पक्षावर जोरदार टीका केली. भ्रष्टाचाराचे तथ्यहीन आरोप केले जात आहेत. शहरात विरोधक कुचकामी ठरले असल्याचे स्पष्ट केले.
गुन्हे दाखल
करण्याची मागणी
माजी विरोधी पक्षनेते मनोज हळदणकर यांनी पालिका प्रशासनाने जनतेची दिशाभूल केली असल्याचे स्पष्ट केले. आर्थिक दिवाळखोरीला जबाबदार असणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची तसेच आर्थिक ताळेबंद सादर करण्याची मागणी केली.