महापालिकेवरून गाजली सभा
By admin | Published: September 15, 2016 02:33 AM2016-09-15T02:33:19+5:302016-09-15T02:33:19+5:30
पनवेल महानगर पालिकेबाबतच्या प्रश्नावर रायगड जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा बुधवारी चांगलीच गाजली. भाजपाने महानगरपालिका होण्यासाठी
अलिबाग : पनवेल महानगर पालिकेबाबतच्या प्रश्नावर रायगड जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा बुधवारी चांगलीच गाजली. भाजपाने महानगरपालिका होण्यासाठी तर, शेकापच्या काही सदस्यांनी त्याला विरोध असल्याचा सूर आळवला. महानगरपालिका अस्तित्वात येण्यासाठी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेच्या ठरावालाही सरकारने महत्त्व द्यावे, यासाठी प्रशासनाने सरकारकडे पत्रव्यवहार करावा, असे आदेश जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेश टोकरे यांनी प्रशासनाला दिले.
उपमुख्यकार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) यांनी महत्त्वाचा पत्रव्यवहार वाचण्यास सुरुवात केली. त्यातील पहिलेच पत्र पनवेल महानगरपालिकेच्याबाबत होते. उपाध्यक्ष अरविंद म्हात्रे यांनी तातडीने पनवेल महानगरपालिकेला विरोध दर्शविला. त्यानंतर राजेंद्र पाचील यांनी आक्षेप घेतला. पनवेल महानगरपालिकेमुळे ग्रामीण भाग विकासाच्या मुख्यप्रवाहात येणार आहे. महानगरपालिका निर्माण झाल्याने मोठ्या प्रमाणात टॅक्स वाढणार असल्याचे बोलत आहे. पनवेल येथील भाजपाचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली या विभागाचा चांगला विकास होण्यावर भर देण्यात असल्याचे पाटील यांनी सांगितले.
सरकारचा निर्णय झालेला आहे. त्यामुळे ग्रामसभा ग्रामपंचायतींचे ठराव घेऊन सरकार टाईमपास करीत असल्याचा आरोप शेकापचे सदस्य आस्वाद पाटील यांनी केला. ग्रामपंचायती या जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत येतात. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेचा ठरावही घेतला पाहिजे. यासाठी प्रशासनाने सरकारकडे पत्रव्यवहार करावा, अशी सूचना पाटील यांनी मांडली. प्रशासनाने तातडीने याबाबत सरकारकडे पत्रव्यवहार करावा असे आदेश अध्यक्ष सुरेश टोकरे यांनी दिले.
विशिष्ट हेतूने त्या-त्या दिवसाला पुरस्कार देण्याचे सरकारने नियोजन केले आहे. त्यामुळे ५ सप्टेंबर रोजी देण्यात येणारे आदर्श शिक्षक पुरस्कार त्याच दिवशी देणे गरजेचे होते, असे मत शिवसेनेचे सदस्य राजीव साबळे यांनी व्यक्त केले. गणेशोत्सवामुळे पुरस्कार सोहळा पुढे ढकलण्यात आल्याचे अध्यक्ष टोकरे यांनी सांगितले.
याप्रसंगी मुख्यकार्यकारी अधिकारी राजेश नार्वेकर, अर्थ व बांधकाम सभापती चित्रा पाटील, समाज कल्याण सभापती गीता जाधव, महिला बालकल्याण सभापती प्रिया मुकादम, अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी अविनाश गोटे, उपमुख्यकार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) प्रकाश खोपकर, उपमुख्यकार्यकारी अधिकारी पुंडलिक साळुंखे, लेखा व वित्त अधिकारी अविनाश सोळंके यांच्यासह विविध पक्षाचे सदस्य, कर्मचारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)