गुरूने दिला ज्ञानरूपी वसा
By admin | Published: July 31, 2015 11:29 PM2015-07-31T23:29:04+5:302015-07-31T23:29:04+5:30
शहरातील विविध संस्था, शाळा, महाविद्यालयांमध्ये शुक्रवारी मोठ्या उत्साहात गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली. गुरूंबद्दल कृतज्ञतेची भावना व्यक्त करण्यासाठी अनेकांनी आपल्या गुरूला
नवी मुंबई : शहरातील विविध संस्था, शाळा, महाविद्यालयांमध्ये शुक्रवारी मोठ्या उत्साहात गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली. गुरूंबद्दल कृतज्ञतेची भावना व्यक्त करण्यासाठी अनेकांनी आपल्या गुरूला गुलाबाची फुले, पुष्पगुच्छ देऊन अभिवादन केले. यानिमित्त शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
अनेक धार्मिक स्थळी विविध पूजाअर्चांचे आयोजन करुन मंदिर परिसर सजविण्यात आले होते. गुरूंसाठी आवडत्या भेटवस्तू घेण्यासाठी शहरातील गिफ्ट शॉपमध्ये गर्दी पहायला मिळाली. यानिमित्ताने शाळा, महाविद्यालयांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते.
बेलापूरमधील विद्याप्रसारक हायस्कूल व ज्यु. कॉलेजमध्ये गुरुपौर्णिमेनिमित्त हस्ताक्षर आणि निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. भारती विद्यापीठ शाळेमध्ये विद्यार्थ्यांना गुरुपौर्णिमेची महती सांगणाऱ्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यामध्ये विद्यार्थ्यांना गुरुपौर्णिमेचे महत्त्व सांगण्यात आले. वाशीतील सेंट लॉरेन्स शाळेतही विद्यार्थ्यांनी आपल्या गुरूंना अभिवादन करून, कविता आणि भाषणे सादर करून आपल्या गुरूंच्या प्रति प्रेमपूर्वक भावना व्यक्त केल्या.
डी. वाय.पाटील स्कूल आॅफ बिझनेस मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयातील शिक्षकांसाठी पुष्पगुच्छ, भेटकार्ड देऊन शिक्षकांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. अनेक शाळांमध्ये सरस्वती पूजन, विद्यार्थ्यांची भाषणे, शिक्षकांचा सत्कार करुन अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. काही विद्यार्थ्यांनी बागेतील, रस्त्यावरील झाडांची फुले गोळा करून त्याच्या पुष्पगुच्छ शिक्षकांना भेट दिला. येथील साई मंदिरामध्ये होम, हवनाचे आयोजन करून भाविकांसाठी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पनवेलमधील स्वामी समर्थ मठातही स्वामीभक्तांनी सकाळपासून दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. संपूर्ण मठ फुलांनी सजविण्यात आला होता. (प्रतिनिधी)
तरुणांची अनोखी स्टाईल : महाविद्यालयीन तरुण-तरुणींनी गिफ्ट शॉपमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. स्वत: तयार केलेले ग्रिटिंग्ज देऊन विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांपर्यंत आदरयुक्त भावना पोहोचविल्या. वाशीतील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय, आयसीएल कॉलेज, तेरणा महाविद्यालय येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
गुलाबाच्या फुलांची मागणी
गुरुंविषयी आदर व्यक्त करण्यासाठी गुलाबाच्या फुलांना मोठ्या प्रमाणात मागणी होती. यामध्ये डच गुलाबांना सर्वाधिक मागणी असल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली. गुलाबाचे फूल १२ ते १५ रुपये किमतीने तर गुच्छ १२० ते २०० रुपये किमतीमध्ये विक्रीस उपलब्ध होते.