नवी मुंबईला सांस्कृतिक शहराची ओळख मिळावी
By admin | Published: February 2, 2016 02:09 AM2016-02-02T02:09:13+5:302016-02-02T02:09:13+5:30
शहराची संस्कृती जपण्याकरिता आयोजित नवी मुंबई महापौर नृत्य व गायन स्पर्धेचा महाअंतिम सोहळा रविवारी मोठ्या जल्लोषात पार पडला.
नवी मुंबई : शहराची संस्कृती जपण्याकरिता आयोजित नवी मुंबई महापौर नृत्य व गायन स्पर्धेचा महाअंतिम सोहळा रविवारी मोठ्या जल्लोषात पार पडला. या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती असलेल्या सुप्रसिद्ध गायिका उषा मंगेशकर यांची विशेष उपस्थिती होती. याप्रसंगी बोलताना नवी मुंबईला सांस्कृतिक शहराची ओळख मिळावी, यासाठी विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना वाव दिला पाहिजे, असे वक्तव्य मंगेशकरांनी केली.
स्पर्धेतील प्रत्येक स्पर्धकाच्या सादरीकरणानंतर त्याच्या गाण्यातील बारकावे टिपत त्यांनी दिलेले अभिप्राय सर्वच स्पर्धकांसाठी प्रोत्साहनपर ठरले. नवी मुंबई महापौर चषकांतर्गत नृत्य स्पर्धेत १३९४ तसेच गायन स्पर्धेत ८४५ स्पर्धकांनी सहभाग घेतला. त्यापैकी प्राथमिक फेरीतून प्रत्येक गटात ४ स्पर्धकांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली होती. अशा ३२ निवडक अंतिम स्पर्धकांच्या महाअंतिम सोहळ्याचे परीक्षण नामांकित गायिका उषा मंगेशकर (गायन) व ‘डान्स इंडिया डान्स’फेम नृत्यदिग्दर्शक सिद्धेश पै (नृत्य) यांनी केले. आघाडीच्या ‘पिंगा’फेम गायिका वैशाली माडे यांनी लोकप्रिय पिंगाच्या झकास सादरीकरणासोबतच उषातार्इंचेच लोकप्रिय मुंगळा सादर करून रसिकांसह उषातार्इंचीही दाद मिळविली. अभिनेत्री दीप्ती भागवत यांनी सादर केलेल्या गाण्यावरही रसिकांनी ताल धरला. या कार्यक्रमाला कलश एन्टरटेन्मेंट यांचे विशेष सहकार्य लाभले.
महानगरपालिकेने आयोजित केलेल्या प्रतिमा - नवी मुंबईची छायाचित्रण स्पर्धेतील व्यावसायिक गटाचे विजेते संदेश रेणोसे, संदीप सूर्यवंशी, नरेंद्र वास्कर, बच्चन कुमार, के. के. चौधरी, सत्यवान वास्कर, नंदकिशोर कुरणे, विवेक थोरात तसेच हौशी गटाचे विजेते संजय पाटील, समीर मांडे, वेद कुऱ्हे, सुबोध भोईर या विजेत्या छायाचित्रकारांना मान्यवरांच्या शुभहस्ते पारितोषिके प्रदान करून सन्मानित करण्यात आले. या १२ विजेत्यांच्या छायाचित्रांचा समावेश नवी मुंबई महानगरपालिका दिनदर्शिका -१६ मध्ये केला आहे.
या महाअंतिम सोहळ्यास माजी मंत्री गणेश नाईक, महापौर सुधाकर सोनवणे, महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे, माजी खासदार डॉ. संजीव नाईक, सभागृह नेते जयवंत सुतार, क्र ीडा व सांस्कृतिक कार्यक्र म समितीचे सभापती प्रकाश मोरे व उपसभापती तनुजा मढवी, विधी समिती सभापती अॅड. भारती पाटील, समाजकल्याण व झोपडपट्टी सुधार समिती सभापती मोनिका पाटील, अतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हाण, नगरसेवक अनंत सुतार, घनश्याम मढवी, उषा भोईर, प्रज्ञा भोईर आदी उपस्थित होते.(प्रतिनिधी)