कर्जत-पनवेलसाठी डेमू गाडी द्या
By Admin | Published: February 23, 2017 06:23 AM2017-02-23T06:23:54+5:302017-02-23T06:23:54+5:30
पुणे-दौंड मार्गावर डेमूच्या (डिझेल मल्टिपल युनिट) माध्यमातून उपनगरीय (लोकल) प्रवासी
कर्जत : पुणे-दौंड मार्गावर डेमूच्या (डिझेल मल्टिपल युनिट) माध्यमातून उपनगरीय (लोकल) प्रवासी सेवा सुरू करण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून जय्यत तयारी सुरू आहे. रेल्वे बोर्डाकडून एक डेमू गाडी मिळाल्यानंतर नुकतीच दुसरी गाडी देखील पुणे विभागात दाखल झाली आहे. यामुळे या मार्गावरील प्रवाशांना उपनगरीय सेवेचे वेध लागले आहेत. पुणे - दौंड मार्गावर ईएमयू (इलेक्ट्रिकल मल्टिपल युनिट) उपनगरीय सेवा सुरू करणे शक्य नसल्याचे स्पष्ट झाल्याने प्रशासनाने या मार्गाचा पर्याय अवलंबला आहे. रेल्वे प्रशासनाने पुणे - दौंडसाठी दोन डेमू उपलब्ध करून दिल्या आहेत. तशाच प्रकारच्या डेमू गाड्या कर्जत - पनवेल या मार्गावर चालविण्यासाठी रेल्वे प्रशासन का उपलब्ध करीत नाही, अशी संतप्त प्रतिक्रि या कर्जतकरांकडून व्यक्त होत आहे.
कर्जत-पनवेल अशी शटल सेवा सुरू करण्याकरिता कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेचे पंकज ओसवाल यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू, पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर व माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या उपस्थितीत कर्जत-पनवेल शटल सेवा सुरू करण्याची विनंती केली होती. ही शटल सेवा सुरू करावी अशी कर्जतकरांची फार पूर्वीपासून मागणी आहे. याकरिता कर्जत-पनवेल मार्ग उभारला गेला, मात्र अद्याप शटल सेवा सुरू झालेली नाही. कर्जत-पनवेल मार्गावरून लोकल सेवा ‘अनफिट’ असल्याचे रेल्वे प्रशासनाने ओसवाल यांना लेखी कळविले आहे, परंतु दिवा-वसईसारखी गाडी धावू शकते असे रेल्वे प्रशासनाने ओसवाल यांना कळविले आहे. मात्र तशी गाडी उपलब्ध नसल्याने कर्जत-पनवेल अशी शटल सेवा सुरू करणे शक्य नसल्याचे रेल्वे प्रशासनाने कळविले आहे.
गेली कित्येक वर्षे कर्जतकर, कर्जत - पनवेल शटल सेवा सुरू करण्याची रेल्वे प्रशासनाकडे विनंती करून सुध्दा रेल्वे प्रशासन कर्जतकरांची मागणी विचारात न घेता उलट कर्जत-पनवेल या मार्गावर डेमू गाडीची आवश्यकता असताना देखील या मार्गावर डेमू गाड्या न देता अशा डेमू गाड्या इतर ठिकाणी उपलब्ध करून रेल्वे प्रशासन कर्जतकरांवर अन्याय करत असल्याचा आरोप पंकज ओसवाल यांनी केला आहे. १ आॅक्टोबर २०१५ पासून दिवा-वसईकरिता जुन्या गाड्या बदलून नवीन गाड्या देण्यात आल्या, तसेच चिपळूण - पनवेल डेमू गाडीला अल्प प्रतिसाद मिळाल्याने ती गाडी दक्षिणेकडे पाठविण्यात आली. याचाच अर्थ असा होतो की रेल्वे प्रशासनाकडे गाड्या उपलब्ध आहेत, मात्र रेल्वे प्रशासनाची कर्जत-पनवेल अशी शटल सेवा चालविण्याची इच्छा नाही असा आरोप पंकज ओसवाल यांनी केलाआहे. मध्य रेल्वे प्रशासनाचे महाप्रबंधक डी. के. शर्मा कर्जत रेल्वे स्थानकात पाहणीसाठी आले असताना पंकज ओसवाल यांनी महाव्यवस्थापकांकडे कर्जत-पनवेल शटल सेवेसाठी आग्रहच धरला होता. त्या वेळी महाप्रबंधकांनी पंकज ओसवाल यांना कर्जत-पनवेल दुहेरी मार्गाचा फायदा कर्जतकरांना होणार असल्याचे सांगताच पंकज ओसवाल यांनी महाप्रबंधकांना दुहेरी मार्गाबद्दल धन्यवाद दिले, परंतु दुहेरीकरणाचे काम पूर्ण होईल तेव्हा होईल, परंतु आता त्वरित अस्तित्वात असलेल्या एकेरी मार्गावरून कर्जतकरांना कर्जत-पनवेल अशी शटल सेवा त्वरित देण्याची विनंती कर्जतकरांच्या वतीने करण्यात आली होती.(वार्ताहर)
‘कर्जत-पनवेल या मार्गावर रेल्वे प्रशासनाने शटल सेवा सुरू करावी. याबाबतीत संबंधित खासदारांनी रेल्वे प्रशासनाशी पत्रव्यवहार करावा व वेळ पडल्यास रेल्वे मंत्री सुरेश प्रभूंना भेटून कर्जत-पनवेल शटल सुरू करणे किती आवश्यक आहे हे पटवून द्यावे. मी स्वत: याबाबतीत गेल्याच आठवड्यात मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डी.के.शर्मा यांच्याकडे आग्रह धरला होता. तसेच खासदारांनी याबाबतीत वेळ पडल्यास गेली अनेक वर्षांपासून कर्जतकरांची मागणी असून सुद्धा कर्जत-पनवेल या मार्गावर शटल सेवा न देण्यासंदर्भात लोकसभेत प्रश्न उपस्थित करावा.’
- पंकज ओसवाल, कर्जत
कर्जतकरांची नाराजी
गेली कित्येक वर्षे कर्जतकर, कर्जत - पनवेल शटल सेवा सुरू करण्याची रेल्वे प्रशासनाकडे विनंती करून सुध्दा रेल्वे प्रशासन कर्जतकरांची मागणी विचारात घेत नसल्याने नाराजी.
कर्जत-पनवेल मार्ग उभारला गेला, मात्र अद्याप शटल सेवा सुरू झालेली नाही. कर्जत-पनवेल मार्गावरून लोकल सेवा ‘अनफिट’ असल्याचे रेल्वे प्रशासनाने पंकज ओसवाल यांना लेखी कळविले आहे.
रेल्वे प्रशासनाने पुणे - दौंडसाठी दोन डेमू गाड्या उपलब्ध करून दिल्या आहेत.