नवी मुंबई : बाजार समित्या व अन्य जीवनावश्यक मालाच्या व्यवसायात कामे करणा-या माथाडी कामगार व अन्य घटकांचा अत्यावश्यक सेवेत समावेश करून त्यांना रेल्वेने आणि महापालिका बस व एसटी बसने प्रवास करण्यास परवानगी द्यावी तसेच या घटकाला विशेष विमा संरक्षण कवच लागू करावे या मागण्यांची पुर्तता करण्याकडे महाराष्ट्र शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे नेते, सरचिटणीस व माजी आमदार नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली माथाडी कामगारांनी मध्य, हार्बर व पश्चिम रेल्वेच्या मशिदबंदर, डॉकयार्ड रोड, रे रोड, कुर्ला, मानखुर्द, वाशी, सानपाडा, तुर्भे, कोपरखैरणे, घणसोली, ऐरोली, दादर, भांडूप, मुलुंड, ठाणे, डोंबिवली, कल्याण, उल्हासनगर, मुंबई सेंट्रल, बांद्रा, अंधेरी, बोरीवली, दहिसर,डहाणू इत्यादी रेल्वे स्टेशन बाहेर कोरोनाची नियमावली आणि कायदा व सुव्यवस्थेचे पालन करीत स्टेशन प्रबंधकांना निवेदन सादर करून कामगार व महाराष्ट्र दिन साजरा केला.
कोरोना या संसर्गजन्य विषाणूला रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने सर्व ठिकाणी लाॅकडाऊन जाहीर केल्यापासून माथाडी कामगार व अन्य घटक बाजार समितीच्या आवारात नागरिकांच्या अन्न-धान्य, कांदा बटाटा, मसाले, भाजी व फळे, गॅस सिलिंडर या जीवनावश्यक मालाची आणि जनावरांचे खाद्य व पिकांचे खत व अन्य मालाची लोडिंग व अनलोडिंगची कामे जीव मुठीत घेऊन करीत आहेत. ही कामे करताना अनेक माथाडी कामगारांना कोरोनाची लागण झाली तर अनेक माथाडी कामगारांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.गे ल्या वर्षभरापासून माथाडी कामगार ही मागणी करीत आहेत,परंतु महाराष्ट्र सरकारने या मागणीकडे लक्ष दिले नाही.
डॉक्टर, महापालिका कर्मचारी कोरोना रूग्णांची सेवा करीत आहेत तर पोलीस यंत्रणा संरक्षण देण्याचे काम करीत आहेत आणि माथाडी कामगार नागरिकांना जीवनावश्यक वस्तूचा पुरवठा होण्यासाठी जीव धोक्यात घालून काम करीत आहे. मग या कष्टांची कामे करणा-या घटकाला अत्यावश्यक सेवेत घेणे, त्यांना रेल्वेने व महापालिका बस आणि एसटी बसने प्रवास करण्यास परवानगी देणे तसेच त्यांना विमा संरक्षण कवच लागू करणे या मागणीकडे महाराष्ट्र शासन का दुर्लक्ष करीत आहे. कष्टांची व अंगावरील स्वरुपात कामे करणा-या माथाडी कामगारांना शासनाने न्याय द्यावा,अशी मागणी व विनंती माथाडी कामगारांच्या- वतीने माथाडी कामगार युनियनने केली आहे.
माथाडी कामगार हा कष्टाची कामे करणारा घटक आहे,या घटकाच्या न्याय मागणीसाठी शांततेने व कोरोना नियमावलीचे पालन करीत रेल्वे व पोलीस प्रशासनाने केलेल्या सहकार्याबद्दल माथाडी कामगार संघटनेने आभार मानले असून,याबाबत शासनाला शिफारस करण्याची मागणी रेल्वे प्रशासनाकडे निवेदनाव्दारे केली आहे.