पनवेल : ऑक्टोबर महिना सुरू झाला, तरी पाऊस काही परतीचे नाव घेत नाही. दिवाळीपर्यंत पाऊस राहण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केला असल्याने विधानसभेच्या मतदानावर पावसाचे सावट कायम आहे. त्यामुळे मतदारांनो, छत्री घेऊन बाहेर पडा; पण मतदान करा, असे आवाहन प्रशासन व उमेदवारातर्फे केले जात आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी रविवारी ईव्हीएम मशिन्स मतदान केंद्रावर रवाना करण्यात आल्या आहेत. मतदान प्रक्रियेवर पावसाचे सावट असून, यंत्रे सुरक्षितरीत्या मतदान केंद्रांवर पोहोचतील, याची काळजी त्या-त्या विधानसभा मतदारसंघांमध्ये यंत्रणेकडून घेण्यात आली आहे. सोमवार, २१ आॅक्टोबर रोजी मतदान प्रक्रिया सकाळी ७ पासून सुरू होईल. त्यामुळे त्या-त्या मतदान केंद्रांवर ईव्हीएम मशिन, कर्मचारी वाहने घेऊन रविवारी मतदान केंद्रांवर रवाना झाल्या आहेत.
गेल्या दोन ते तीन दिवसांपासून पाऊस पडत आहे. वादळी वारा आणि मुसळधार पाऊस आल्यास या भागातील व्यवस्थापन प्रशासनाच्या नियंत्रणाबाहेर जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. लोकसभा निवडणुकीप्रमाणेच या निवडणुकीतही मतदान केंद्रावर मोबाइल घेऊन जाण्यास बंदी आहे. मतदान केंद्रांवरील अधिकारी, कर्मचाऱ्यांनाही मोबाइल नेता येणार नाही.
पावसाचे सावट असल्याने प्रशासन व उमेदवारापुढे जास्तीत जास्त मतदान होण्याचे आव्हान असणार आहे. सोमवारीही पावसाची शक्यता वर्तविण्यात येत असल्याने मतदारांना मतदान करण्यासाठी उमेदवार व प्रशासनाला कठोर मेहनत घ्यावी लागणार आहे. सामाजिक संस्थांकडूनही जागृती करीत आहेत.
निवडणूक प्रक्रियेचे व्हिडीओ चित्रीकरण करण्यात येणार असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त राहणार आहे. संवेदनशील मतदार केंद्रांवर कोणत्याही प्रकारचा गोंधळ होऊ नये, यासाठी या मतदान केंद्रावर अधिक पोलीस बंदोबस्त असणार आहे.