दासगाव : गुरुवारी ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जय घोषात पाच दिवसाच्या गणपतीचे विसर्जन दासगाव परिसरात शांततेत पार पडले. हे विसर्जन गाव खाडी आणि सावित्री खाडीमध्ये करण्यात आले. जवळपास १५० हून अधिक गणपतीचे विसर्जन या वेळी करण्यात आले. नागरिकांनी विसर्जनाच्या वेळी ‘गणपती बाप्पा मोरया’चा जय घोष करताना करोनापासून मुक्ती द्या असा ही जयघोष केले. तर सोशल डिस्टनसिंग ठेवत नागरिकांनी विसर्जन केले.
गणपतीचे आगमन झाल्यानंतर दीड , पाच आणि दहा दिवस असे तीन वेळा गणपतीचे विसर्जन करण्यात येते. शनिवारी गणपतीचे आगमन झाले. रविवारी दीड दिवसांच्या गणपतीचे विसर्जन करण्यात आले होते. तर गुरुवारी पाच दिवसांच्या गणपतीचे विसर्जन करण्यात आले. दासगावमध्ये गाव खाडी आणि सावित्री खाडीमध्ये विसर्जन करण्यात आले असून जवळपास दीडशे हुन अधिक गणपती मूतीचे यावेळी विसर्जन करण्यात आले. विसर्जनाला दुपारी ४ वाजल्या पासून सुरवात झाली होती तर ६ वाजेपर्यंत विसर्जन होत होते. दर वर्षी या विसर्जनांच्या मोठ मोठ्या मिरावणुकी काढल्या जात असत मात्र यंदा कोरोनाच्या पार्श्व भूमीवर हे विसर्जन सोशल डीस्टनसिंग ठेवत शांततेत करण्यात आले.बामणे कोंड, न्हावी कोंड,जाधव वाडी,पाटील आलीआणि परीट आळीच्या गणपतीचे विसर्जन गावखाडी (नदी) त करण्यात आले तर भोई वाडा, पेटकर आळी आणि नवीन वसाहत गणेश नगर येथील गणेशमूर्तींचे विसर्जन सावित्री खाडीमध्ये करण्यात आले.गौरी-गणपतींना भावपूर्ण निरोपनवी मुंबई : शहरातील गौरी आणि गणपतींना गुरुवारी विविध तलावांवर भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विसर्जन स्थळांवर नागरिकांची गर्दी होऊ नये यासाठी कृत्रिम तलावांवर भक्तांनी नियमांचे पालन करीत लाडक्या बाप्पांना निरोप दिला. नवी मुंबई शहरात कोरोनाच्या संकटामुळे भाविकांनी काळजी घेत आणि नियमांचे पालन करीत बाप्पाला निरोप देण्याचे आवाहन पालिकेकडून करण्यात आले होते. दरवर्षी शहरातील २३ विसर्जन तलावांवर मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. या गर्दीमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असल्याने सुमारे १३५ कृत्रिम तलावांची निर्मिती महापालिकेच्या माध्यमातून करण्यात आली आहे. भक्तांनी या तलावांवर दीड, अडीच आणि पाच दिवसांच्या गणपती बाप्पांचे तसेच गौरींचे विसर्जन सुरळीतरीत्या केले. विसर्जन ठिकाणी नियमांचे पालन करण्यात आले. शहरातील विसर्जनस्थळी व विविध ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त होता. विसर्जन ठिकाणी महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी तसेच विविध सामाजिक संस्थांचे कर्मचारी तैनात करण्यात आले होते. कोरोनाचे संकट लक्षात घेता भक्तांनीदेखील काटेकोरपणे सर्व नियमांचे पालन केले. शहरातील प्रत्येक विभागात तलावांची उपलब्धता मोठ्या प्रमाणावर असल्याने विसर्जनस्थळी भाविकांची गर्दी नव्हती.पनवेलमध्ये गाजावाजा न करता शांततेत गौरी, गणेशमूर्तींचे विसर्जनपनवेल परिसरातील गौरी-गणपतींना गुरुवारी भावपूर्ण निरोप देण्यात आला. कोरोनाच्या सावटामुळे कोणत्याही प्रकारचा गाजावाजा न करता अगदी साध्या पद्धतीने विसर्जन पार पडले.
ग्रामीण भाग व पनवेल महापालिका क्षेत्रातील गौरी-गणपतींचे दुपारनंतर विसर्जन करण्यात आले. विसर्जनासाठी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. रस्ते वाहतुकीत काही प्रमाणात बदल करण्यात आले होते. महापालिका क्षेत्रात ४१ कृत्रिम विसर्जन घाट तयार करण्यात आले आहेत. त्या ठिकाणी रात्री उशिरापर्यंत विसर्जन सुरू होते. पनवेल, नवीन पनवेल, खांदाकॉलनी, खारघर, कळंबोली, तळोजे तसेच ग्रामीण भागात हे विसर्जन शांततेत पार पडले. संध्याकाळी ४ वाजल्यानंतर गणपती विसर्जनाला सुरुवात झाली. या वर्षी ढोल-ताशांचा व फटाक्यांचा गजर क्वचितच ऐकायला मिळाला. भावपूर्ण वातावरणात गौरी-गणपतीला निरोप देण्यात आला. पोलिसांनी वाहतुकीचे उत्तम नियोजन केले होते. महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख, पोलीस उपायुक्त अशोक दुधे यांनी ठिकठिकाणच्या विसर्जन तलावांना भेटी देऊन विसर्जन व्यवस्थेचा आढावा यापूर्वी घेतला होता. पालिकेच्या वतीने ठिकठिकाणच्या विसर्जन तलावांवर जवळपास ५०० स्वयंसेवक तैनात करण्यात आले होते. त्याचप्रमाणे महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारीही उपस्थित होते.