घणसोलीतील पालिका शाळेची इमारत अपूर्णच
By admin | Published: July 27, 2015 11:38 PM2015-07-27T23:38:25+5:302015-07-27T23:38:25+5:30
घणसोली येथे चार वर्षांपूर्वी महापालिकेने शाळा बांधण्यात सुरुवात केली होती. मात्र मुदत संपली तरी शाळेच्या इमारतीचे काम पूर्ण न झाल्याने रहिवाशांमध्ये नाराजी आहे
नवी मुंबई : घणसोली येथे चार वर्षांपूर्वी महापालिकेने शाळा बांधण्यात सुरुवात केली होती. मात्र मुदत संपली तरी शाळेच्या इमारतीचे काम पूर्ण न झाल्याने रहिवाशांमध्ये नाराजी आहे. बांधकामात अनेक विघ्ने आल्याने इमारत पूर्ण होण्यास विलंब होत असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.
घणसोली सिम्प्लेक्स व घरोंदा परिसरातील गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी सेक्टर ७ येथे महापालिकेची शाळा उभारली जात आहे. चार वर्षांपूर्वी सुमारे ८ कोटी रुपये खर्चाचे हे काम ओमकार कन्स्ट्रक्शन या ठेकेदाराला देण्यात आले. त्यानुसार मोठ्या उत्साहात या शाळा इमारत उभारणीच्या कामाचे भूमिपूजनही करण्यात आले. परिसरात महापालिकेची शाळा होत असल्याने स्थानिकांनी मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न सुटल्याची भावना व्यक्त केली होती. मात्र चार वर्षे उलटूनही चार मजली इमारतीचे बांधकाम पूर्ण होवू शकलेले नाही. त्यामुळे स्थानिकांकडूनही प्रशासनाच्या धीम्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त होत आहे. परिसरात महापालिकेची शाळा नसल्याने मध्यमवर्गीय कुटुंबातील व्यक्तींना मुलांच्या शिक्षणासाठी खाजगी शाळेची पायरी चढावी लागत आहे. त्यामध्ये खिशाला आर्थिक झळही त्यांना सोसावी लागत आहे. महापालिकेच्या शाळा इमारतीचे काम लवकरात लवकर पूर्ण केले जावे अशी भावनाही त्यांच्याकडून व्यक्त होत आहे. चार वर्षांत या शाळा इमारतीचे काम अवघ्या दुसऱ्या मजल्यापर्यंत पोचले आहे. त्यामुळे पूर्ण इमारत उभी होण्यास अद्यापही वर्षाचा कालावधी जाण्याची शक्यता आहे. एप्रिल २०१५मध्ये या ठेकेदाराची मुदतही संपली आहे. इमारतीचे डिझाईन तपासणीसाठी आयआयटीकडे पाठवण्यात आले होते. त्यामध्ये बराच कालावधी गेल्याने वेळेवर कामाला सुरवात झाली नाही. त्यानंतर खोदकामादरम्यान जमिनीखाली मोठा दगड आढळला होता. हा दगड फोडून पायाभरणी करण्यातही विलंब झाल्याचे ठेकेदाराने प्रशासनाला कळवले आहे. हे अडथळे पार करून कामाला सुरवात होत असतानाच रेती, सिमेंट अशा बांधकाम साहित्यांच्या पुरवठ्यात अडचणी आल्या होत्या. त्यामुळे शाळा इमारतीच्या बांधकामाची गती अधिकच मंदावल्याचे महापालिकेचे कार्यकारी अभियंता मदन वाघचौरे यांनी सांगितले. तर डिसेंबरपर्यंत काम पूर्ण करण्याचाही प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)