घणसोलीतील प्रकार : अज्ञात पॅराशूटमुळे खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2019 06:50 AM2019-02-04T06:50:12+5:302019-02-04T06:50:22+5:30
घणसोली परिसरात अज्ञात पॅराशूटमुळे खळबळ उडाली आहे. दहशतवाद विरोधी पथकाकडून संपूर्ण परिसराची झाडाझडती घेण्यात आली आहे. या वेळी एक विदेशी महिला पॅराशूटमधून उतरल्याचे काही प्रत्यक्षदर्शींनी पोलिसांना सांगितले आहे.
- सूर्यकांत वाघमारे
नवी मुंबई - घणसोली परिसरात अज्ञात पॅराशूटमुळे खळबळ उडाली आहे. दहशतवाद विरोधी पथकाकडून संपूर्ण परिसराची झाडाझडती घेण्यात आली आहे. या वेळी एक विदेशी महिला पॅराशूटमधून उतरल्याचे काही प्रत्यक्षदर्शींनी पोलिसांना सांगितले आहे.
घणसोली सेक्टर १५ येथील पामबीच मार्गालतच्या परिसरात शनिवारी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. येथे पॅराशूट उडत असल्याचे काहींच्या निदर्शनास आल्यावर त्यांनी पोलिसांना माहिती दिली. मात्र, पोलिसांना काहीच आढळून न आल्याने रविवारी दहशतवाद विरोधी पथकाने परिसराची पाहणी केली. या वेळी स्कायलार्क इमारतीमधील १९व्या मजल्यावरील रहिवासी शोभा रावल यांनी घराच्या खिडकीजवळून पॅराशूट जाताना पाहिल्याचे सांगितले, त्यामुळे रविवारी परिसराची व इमारतींच्या छतांची झाडाझडती घेण्यात आली. खाडीलगतच्या मोकळ्या जागेत पॅराशूटद्वारे उतरताना विदेशी महिलेला पाहिल्याचेही काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. मात्र, ही विदेशी महिला कोण? तिने पॅराशूटचे उड्डाण कुठून केले? हे समजू शकलेले नाही.
घणसोलीत अज्ञात पॅराशूट उडाल्याची तक्रार आली आहे. विदेशी महिला व पुरुषाला पॅराशूटसोबत पाहिल्याचे काहींचे म्हणणे आहे. प्रशिक्षित व्यक्तीकडूनही हौसेखातर हे पॅराशूट वापरले
गेल्याची शक्यता असून, अधिक तपास सुरू आहे. - तुषार दोशी,
पोलीस उपआयुक्त, गुन्हे शाखा
ज्या ठिकाणी हे पॅराशूट उडताना पाहिले गेले, त्या ठिकाणी १५ ते २५ मजल्यांच्या इमारती आहेत. त्यापैकी एखाद्या इमारतीवरून पॅराशूट घेऊन उडी मारल्याचीही शक्यता आहे. पाहणी दरम्यान बांधकाम सुरू असलेल्या श्री समर्थ हाइट या २३ मजली इमारतीच्या छतावर कामगारांव्यतिरिक्त अज्ञात व्यक्तीच्या बुटाचे ठसे आढळून आले आहेत.