महापालिकेच्या अर्थसंकल्पाकडे घणसोलीकरांचे लक्ष
By admin | Published: February 16, 2017 02:19 AM2017-02-16T02:19:41+5:302017-02-16T02:19:41+5:30
हस्तांतराच्या प्रक्रियेनंतर घणसोलीकरांचे महापालिकेच्या अर्थसंकल्पाकडे लक्ष लागले आहे. नोडमधील सिडकोच्या प्रलंबित कामांमुळे
नवी मुंबई : हस्तांतराच्या प्रक्रियेनंतर घणसोलीकरांचे महापालिकेच्या अर्थसंकल्पाकडे लक्ष लागले आहे. नोडमधील सिडकोच्या प्रलंबित कामांमुळे हस्तांतराला काहींचा विरोध असतानाही हे हस्तांतरण झाले आहे. यावेळी इतर नोडच्या तुलनेत घणसोलीच्या विकासावर अधिकाधिक भर दिला जाईल, असे आश्वासन पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिले होते.
अनेक वर्षांपासून घणसोलीकरांना प्रतीक्षा असलेली नोडच्या हस्तांतराची प्रक्रिया डिसेंबर महिन्यात पूर्ण झालेली आहे. या हस्तांतरानंतर होणाऱ्या महापालिकेच्या अर्थसंकल्पाकडे घणसोलीकरांचे लक्ष लागले आहे. सुविधांच्या माध्यमातून नेमकं काय पदरात पडतंय याची उत्सुकता त्यांच्यात आहे. सिडकोसोबत झालेल्या हस्तांतरणाच्या प्रक्रियेनंतर घणसोलीत झालेल्या वॉक विथ कमिशनर उपक्रमावेळी आयुक्तांनी घणसोलीच्या विकासात कसलीही काटकसर केली जाणार नसल्याचे आश्वासन दिले होते. नोडच्या विकासाकडे सिडकोकडून झालेल्या दुर्लक्षामुळे घणसोली सेक्टर विभागातील रहिवाशांना अनेक समस्या भेडसावत होत्या. इमारती उभारण्यासाठी भूखंड विकले, परंतु त्याठिकाणी रस्ते, मलनि:सारण वाहिन्या अशा मूलभूत सुविधा पुरवण्यात आलेल्या नव्हत्या. अशातच हा नोड सिडकोकडे असल्याच्या कारणावरुन पालिकेकडूनही पुरवल्या जाणाऱ्या सुविधांमध्ये हात आखडता घेतला जात होता. यामुळे लवकरात लवकर हा विभाग पालिकेच्या ताब्यात घेतला जावा अशी रहिवाशांची मागणी होती. परंतु आहे त्या स्थितीत नोडचे पालिकेला हस्तांतरण झाल्यास पालिकेवर आर्थिक भार पडणार असल्यामुळे काहींनी विरोध देखील केला होता. अशातच सिडकोने देखील सुविधांवर खर्चासाठी नाममात्र रक्कम देत पालिकेची बोळवण केलेली आहे. त्यामुळे गुरुवारी प्रशासनाकडून स्थायी समितीला सादर होणाऱ्या अर्थसंकल्पाकडे घणसोलीकरांचे विशेष लक्ष लागले आहे. उद्याने, खेळाची मैदाने यासाठी नोडमध्ये भूखंड राखीव असुन हे भूखंड पालिकेच्या ताब्यात आहेत. आरक्षणाप्रमाणे या भूखंडांचा विकास व्हावा, अशी त्यांची मूलभूत मागणी आहे. (प्रतिनिधी)