घणसोलीतील आगाराला निवडणुकीनंतरचा मुहूर्त
By admin | Published: April 3, 2016 03:51 AM2016-04-03T03:51:56+5:302016-04-03T03:51:56+5:30
महापालिकेच्या वतीने घणसोली येथे साकारत असलेल्या आदर्श आगाराचे काम अंतिम टप्प्यावर आले आहे. कामाची मुदत संपत आल्याने ठेकेदाराकडून उर्वरित कामे शीघ्रगतीने सुरू
नवी मुंबई : महापालिकेच्या वतीने घणसोली येथे साकारत असलेल्या आदर्श आगाराचे काम अंतिम टप्प्यावर आले आहे. कामाची मुदत संपत आल्याने ठेकेदाराकडून उर्वरित कामे शीघ्रगतीने सुरू आहेत. तर दिघ्यातील पोटनिवडणुकीनंतर या आदर्श आगाराच्या उद्घाटनाचा मुहूर्त निश्चित होण्याची शक्यता आहे.
घणसोली सेक्टर १५ येथे महापालिकेच्या वतीने एनएमएमटीसाठी आगार उभारणीचे काम सुरू आहे. सुमारे ९.५ एकर जागेत डिसेंबर २०१४ पासून आगाराचे बांधकाम सुरू असून ठेकेदारास मार्च २०१६ पर्यंतची मुदत होती. त्यानुसार १८ महिन्यांचा निश्चित कालावधी संपल्याने आगाराची उर्वरित कामे उरकण्यावर ठेकेदाराकडून भर देण्यात आला आहे. येत्या १० ते १५ दिवसांत हा आगार वापरासाठी सज्ज होईल, असा परिवहन प्रशासनाचा विश्वास आहे. घणसोलीचे हे आगार एनएमएमटीच्या इतर दोन आगारांपेक्षा आदर्श बनवण्याचा प्रयत्न परिवहनने केलेला आहे. याकरिता तुर्भे व आसूडगाव आगारात जाणवलेल्या त्रुटी घणसोली आगारात भरून काढण्याचा प्रयत्न झालेला आहे. बसच्या दुरुस्तीसह धुण्याची अद्ययावत यंत्रणा त्या ठिकाणी बसवली जाणार आहे. परिवहनच्या ताफ्यात येणाऱ्या नव्या बस या आगारातून शहरातील विविध मार्गांवर सोडल्या जाणार आहेत.
परंतु हा आदर्श आगार खासगी ठेकेदाराच्या ताब्यात जाण्याची देखील शक्यता आहे. महापालिकेने नुकताच परिवहनच्या गाड्या खासगी ठेकेदारामार्फत चालवण्याचा निर्णय घेतलेला आहे. याकरिता सात वर्षांच्या कालावधीसाठी ठेकेदाराची निवड केली आहे. परिवहनच्या ताफ्यात दाखल होणाऱ्या १८५ गाड्यांचे खासगीकरण होणार आहे.
आगाराचे काम अंतिम टप्प्यात असून उर्वरित कामेही लवकरच पूर्ण केली जातील. पोटनिवडणुकीची आचारसंहिता लागू आहे. ती संपताच उद्घाटन केले जाईल
- साबू डॅनिअल, परिवहन सभापती