घणसोली-तळवली जुना पूल धोकादायक, अपघाताची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2018 03:20 AM2018-09-21T03:20:28+5:302018-09-21T03:20:31+5:30

घणसोली आणि तळवली गावाला जोडणारा ग्रामपंचायती काळातील पूल जीर्ण झाला आहे.

Ghansoli-Polished old pool is dangerous, the possibility of an accident | घणसोली-तळवली जुना पूल धोकादायक, अपघाताची शक्यता

घणसोली-तळवली जुना पूल धोकादायक, अपघाताची शक्यता

Next

नवी मुंबई : घणसोली आणि तळवली गावाला जोडणारा ग्रामपंचायती काळातील पूल जीर्ण झाला आहे. ठिकठिकाणी तडे गेले आहेत, त्यामुळे कोणत्याही क्षणी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या प्रकाराकडे महापालिकेने सपशेल दुर्लक्ष केल्याने नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे.
घणसोली गाव, नोड आणि तळवलीला जोडणारा सध्या हा एकमेव पूल आहे. घणसोली ते ऐरोली पामबीच मार्गाचे काम खारफुटीमुळे रखडले आहे, त्यामुळे सध्या चार ते पाच कि.मी. लांबीच्या या एकमेव पुलाचा वापर होत आहे. हलक्या वाहनांसह अवजड वाहनेसुद्धा याच पुलावरून जा-ये करतात, त्यामुळे पुलाला ठिकठिकाणी तडे गेले आहेत. स्लॅब निखळले आहेत, भिंती मोडकळीस आल्या आहेत. अगदी जीर्ण अवस्थेत असलेल्या या पुलावरून रात्रंदिवस वाहतूक सुरू आहे, त्यामुळे दिवसेंदिवस हा पूल खचताना दिसत आहे. पुलाच्या भिंतीचे प्लॅस्टर कोसळल्याने गंजलेल्या व तुटलेल्या लोखंडी तारा स्पष्टपणे दिसत आहेत. कोणत्याही क्षणी हा पूल कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान, या पुलाच्या दुरुस्तीसाठी महापालिकेने अलीकडेच निविदा काढल्याची माहिती स्थानिक नगरसेवक द्वारकानाथ भोईर यांनी ‘लोकमत’ला दिली. दिवाळीपूर्वी पुलाच्या दुरुस्तीचे काम सुरू होईल. त्याचबरोबर येथील रस्त्याचेही डांबरीकरण केले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
>महापालिकेचे दुर्लक्ष
कोपरखैरणे मार्गाने घणसोली आणि पुढे तळवलीकडे जाण्यासाठी हा एकमेव जुना पूल आहे, त्यामुळे बहुतांशी वाहनधारक याच पुलाचा वापर करतात. विशेष म्हणजे, या पुलापर्यंत जाणारा रस्ताही कच्चा आहे. मागील अनेक वर्षांपासून या रस्त्याचे कामही रखडले आहे. त्यावर दिवाबत्तीची सुविधा नाही, त्यामुळे रात्रीच्या वेळी वाहनधारकांची कसरत होत आहे. या प्रकाराकडे महापालिकेने सोयीस्करपणे दुर्लक्ष केल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे. पुलाची नियमित डागडुजी केल्यास घणसोली आणि तळवलीला जोडणारा हा एक कायमस्वरूपी पर्याय होऊ शकतो, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
>हा पूल पुढे खाडीला मिळतो; परंतु पुलाखालून वाहणाऱ्या नाल्यात मोठ्या प्रमाणात घनकचरा साचला आहे, तसेच त्यात मेलेली कुत्री, डुकरे टाकून दिली आहेत, तसेच या घाणीत उंदीर आणि घुशींचा सुळसुळाट झाला आहे, त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे. नागरी आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

Web Title: Ghansoli-Polished old pool is dangerous, the possibility of an accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.