घणसोली हस्तांतरण प्रगतिपथावर
By admin | Published: November 18, 2016 03:58 AM2016-11-18T03:58:20+5:302016-11-18T03:58:20+5:30
घणसोली नोड हस्तांतर करण्याची प्रक्रिया लवकर पूर्ण करावी
नवी मुंबई : घणसोली नोड हस्तांतर करण्याची प्रक्रिया लवकर पूर्ण करावी, हस्तांतरणापूर्वी पायाभूत सुविधांची सर्व कामे पूर्ण करण्यात यावी, अशी मागणी आमदार संदीप नाईक यांनी केली असून मागण्यांचे निवेदन सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांना दिले आहे.
सिडकोने घणसोली नोडमधील समस्या सोडवून तो महापालिकेकडे हस्तांतर करावा यासाठी आमदार संदीप नाईक यांनी २०१० पासून सिडकोकडे पाठपुरावा सुरू केला आहे. वारंवार सिडको व्यवस्थापनाकडे पाठपुरावा केला आहे. पत्रव्यवहार व प्रत्यक्ष भेटून येथील समस्या निदर्शनास आणून दिल्या आहेत. भूषण गगराणी यांची नुकतीच भेट घेवून याविषयी चर्चा केली. गगराणी यांनी हस्तांतरणाची प्रक्रिया लवकरच पूर्ण करत असल्याचे आश्वासन दिले आहे. सिडकोने कामाबरोबरच, चांगला दर्जा राहील याकडे लक्ष द्यावे. जी कामे महापालिका करणार आहे त्याचा परतावा पालिकेला देण्यात यावा, अशी मागणी नाईक यांनी केली.
घणसोली हस्तांतरणाविषयी माहिती देताना नाईक म्हणाले, जवळपास सहा वर्षांपासून पाठपुरावा करत आहोत. आतापर्यंत सिडकोचे अध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालक या सर्वांना वारंवार पत्रे दिली आहेत. त्यांची भेट घेवून चर्चा केली आहे. लवकरच हस्तांतरणाची प्रक्रिया मार्गी लागेल असा विश्वासही व्यक्त केला.