घणसोलीकर महानगरपालिका रुग्णालयाच्या प्रतीक्षेत
By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2020 02:00 AM2020-12-08T02:00:21+5:302020-12-08T02:01:18+5:30
Navi Mumbai News : पालिकेच्या वतीने घणसोली येथे आरक्षित असलेला रुग्णालयाचा भूखंड धूळ खात पडून आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भविष्यात विभागनिहाय रुग्णालयांची आवश्यकता निर्माण झाली आहे.
नवी मुंबई : पालिकेच्या वतीने घणसोली येथे आरक्षित असलेला रुग्णालयाचा भूखंड धूळ खात पडून आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भविष्यात विभागनिहाय रुग्णालयांची आवश्यकता निर्माण झाली आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून कागदोपत्री मंजूर असलेले रुग्णालय प्रत्यक्षात उतरावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
शहरात कोरोना पसरत असताना, त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी पालिकेची रुग्णालये उपयुक्त ठरली आहेत. सर्वसामान्यांच्या खिशाला पालिकेचा उपचार परवडणारा असल्याने, अनेक जण कोरोनावर पालिकेच्या रुग्णालयातच उपचार घेतला आहे. त्यामुळे शासकीय रुग्णालयांचे महत्त्व दिसून आल्याने, विभागनिहाय रुग्णालयांची आवश्यकता भासत आहे. तसे झाल्यास खासगी रुग्णालयांकडून होणारी आर्थिक पिळवणूक थांबू शकते. त्याच भावनेतून घणसोली कॉलनी परिसरातही पालिकेचे रुग्णालय उभारण्याची मागणी होत आहे. त्यासाठी आरक्षित असलेला भूखंड वापरात आणावा, अशीही मागणी होत
आहे.
घणसोली सिम्प्लेक्स व घरोंदा परिसरात मध्यमवर्गीय व माथाडी कामगारांच्या कुटुंबीयांचे वास्तव्य आहे. त्या ठिकाणी पालिकेचे रुग्णालय नसल्याने त्यांना वाशी अथवा ऐरोलीला जावे लागत आहे, अथवा खासगी रुग्णालयाची पायरी चढून खिसा रिकामा करावा लागत आहे.
मात्र, पालिकेचे रुग्णालय झाल्यास परिसरातल्या नागरिकांना आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचा आधार मिळू शकतो. सध्या घणसोली गाव येथे कार्यरत असलेल्या आरोग्य केंद्राची जागा अपुरी पडत आहे. यामुळे तिथल्या कर्मचाऱ्यांसह चाचणीसाठी जाणाऱ्या रुग्णांचीही गैरसोय होत आहे. यामुळे स्वतंत्र जागी आरोग्य केंद्र अथवा रुग्णालय झाल्यास वैद्यकीय कर्मचाऱ्यांसह नागरिकांनाही उपयुक्त ठरू शकते. त्यामुळे पालिकेमार्फत लवकरात लवकर रुग्णालयासाठी राखीव भूखंड वापरात आणावा, अशी मागणी होत आहे.