घणसोलीच्या बंद मलनिःस्सारण केंद्रामुळे ठाणे खाडीत प्रदूषण वाढले; नॅटकनेक्ट फाउंडेशनची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार
By नारायण जाधव | Published: October 23, 2023 12:19 PM2023-10-23T12:19:53+5:302023-10-23T12:21:17+5:30
नवी मुंबई महानगरपालिकेद्वारे (मनपा) चालवला जाणारा मलनिःस्सारण केंद्र (एसटीपी) बंद पडणे ही लोकांच्या आरोग्यासाठी गंभीर बाब आहे.
नवी मुंबई : घणसोलीतील ३७ दशलक्ष लीटर एवढ्या प्रचंड प्रमाणामध्ये प्रक्रिया न केलेले सांडपाणी दररोज थेट ठाणे खाडीत प्रवाहित केले जात असल्याची पर्यावरणवाद्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार केली आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेद्वारे (मनपा) चालवला जाणारा मलनिःस्सारण केंद्र (एसटीपी) बंद पडणे ही लोकांच्या आरोग्यासाठी गंभीर बाब आहे. विषारी पाणी खाडीत शिरल्यामुळे, त्याचा जैवविविधता आणि समुद्री जीवनावर घातक परिणाम होत असल्याचा आरोप नॅटकनेक्ट फाउंडेशनचे संचालक बी एन कुमार यांनी मुख्यमंत्र्यांना केलेल्या तक्रारीत केला आहे.
नॅटकनेक्ट फाउंडेशनने केलेल्या तक्रारीला प्रतिसाद देत नवी मुंबई मनपाचे शहर अभियंता संजय देसाई यांनी एसटीपी वारंवार बंद पडण्याची तसेच महानगरपालिका प्रकल्प पुन्हा सुरु करण्याचे सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत असल्याचा दावा केल्याचे कुमार म्हणाले.
कुमार यांनी ही समस्या मुख्यमंत्र्यांपर्यंत नेली आहे. एसटीपी प्रकल्प असलेल्या जमीनीवर कान्हा पाटील यांनी मालकीचा दावा केल्यामुळे प्रकल्पावर त्याचा विपरीत परिणाम झाला आहे. सदर भूखंड घणसोली नवी मुंबई येथील सेक्टर १५ मध्ये येतो. या भागात मोठा विकास झालेला आहे. सिडकोने आपल्याला कोणतीही भरपाई दिलेली नाही असा दावा कान्हा पाटील यांनी केला आहे, त्यामुळेच त्यांनी प्रकल्प बंद पाडला आहे.
कुमार यांनी पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी या वादाचे लवकरात लवकर निराकरण करण्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विनंती केली आहे.
नवी मुंबईमध्ये दीर्घकाळ वास्तव्य असलेल्या कुमार यांनी घणसोली आता महत्वपूर्ण रियल्टी स्थानांपैकी एक बनत असल्याची बाब निदर्शनास आणून दिली. गेल्यावर्षीच्या जूनमध्ये सिडकोने मागविलेल्या निविदेस घणसोलीच्या भूखंडाची किंमत प्रति चौ.मीटर ३ लाखांहून देखील जास्त होती.
महाकाय व्यावसायिक आणि रहिवासी कॉंप्लेक्सचे या भाग निर्माण करताना सिडकोने एसटीपी समस्येची साधी दखल देखील घेतली नाही, ही बाब अतिशय धक्कादायक आहे असे कुमार म्हणाले.