नवी मुंबई : घणसोली गावाला स्वातंत्र्य लढ्याची ऐतिहासिक ओळख आहे. या गावातील अनेकांनी स्वातंत्र्य लढ्यात सहभाग घेतला होता. अनेकांनी तुरुंगवास भोगला होता. या गावाची ऐतिहासिक ओळख अबाधित राहावी, यादृष्टीने महापालिकेने गावातील स्वातंत्र्यसैनिकांना मानवंदना म्हणून ठिकठिकाणी १४ नामफलक लावले होते, परंतु काळाच्या ओघात हे सर्व नामफलक गायब झाले आहेत.ब्रिटिश राजवटीत देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी तुरुंगवास भोगला, लाठीचार्ज सहन केला, काळ्या पाण्याची आणि नजरकैदेची शिक्षा भोगली अशा स्वातंत्र्य सैनिकांच्या आठवणींना उजाळा मिळावा यादृष्टीने महापालिकेने गावातील प्रमुख चौक व रस्त्यांचे नामकरण केले होते. गावातील स्वातंत्र्यसैनिकांच्या नावाचे फलक लावण्यात आले होते. परंतु या फलकांची, चबुतऱ्याची नियमित देखरेख करण्यात आली नाही. त्यामुळे यातील बहुतांशी फलक आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. गावातील हनुमान मंदिराच्या प्रांगणात महापालिकेने २0 मार्च १९९९ रोजी ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक दत्ताजी ताम्हणे यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वातंत्र्यसंग्राम चौक उभारण्यात आला होता. मात्र मागील काही वर्षात या चौकाला आता महावितरणच्या ट्रान्सफॉर्मरने विळखा घातला आहे. त्यामुळे या स्वातंत्र्यसंग्राम चौकाचे अस्तित्व संपुष्टात आले आहे.शंकर शनिवार पाटील, रामा दिवड्या रानकर, महादू गांडूल पाटील, आंबो लडक्या पाटील, पदा पोशा पाटील, वामन पदा पाटील,रघुनाथ कृष्णा पवार, नारायण मरोजी मढवी, वाल्मीक महादू पाटील,चाहू आंबो पाटील, जोमा पदा पाटील, वाळक्या उंदºया पाटील, परशुराम पदा पाटील आणि हाल्या हिरा म्हात्रे या १४ स्वातंत्र्यसैनिकांच्या नावाचे चबुतरे ठिकठिकाणी बांधण्यात आले होते. परंतु आज हे चबुतरे गायब झाले आहेत. या ठिकाणी फेरीवाल्यांचे अतिक्रमण वाढले आहे. नामफलकांचे अस्तित्व संपुष्टात आले आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे. यासंदर्भात गावातील तरूण मंडळी संघटित झाली आहे. गायब झालेले स्वातंत्र्यसैनिकांचे नामफलक तसेच चबुतºयांची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी सोशल मीडियाच्या माध्यमातून जोर धरू लागली आहे.
घणसोलीतील स्वातंत्र्यसैनिकांचे नामफलक गायब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2018 1:53 AM