घारापुरी बेटाची अर्थव्यवस्था ठप्प, २३० कुटुंबीयांना फटका

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2020 11:42 PM2020-08-18T23:42:02+5:302020-08-18T23:43:08+5:30

रोजगाराचा एकमेव मार्गच बंद झाल्यामुळे रहिवासी संकटात असून, पर्यटन हंगाम पूर्ववत होण्याची वाट सर्वजण पहात आहेत.

Gharapuri Island's economy stagnates, hitting 230 families | घारापुरी बेटाची अर्थव्यवस्था ठप्प, २३० कुटुंबीयांना फटका

घारापुरी बेटाची अर्थव्यवस्था ठप्प, २३० कुटुंबीयांना फटका

Next

मधुकर ठाकूर
उरण : जागतिक वारसास्थळ असलेल्या घारापुरी (एलिफंटा) बेटावर पाच महिन्यांपासून पर्यटकांना बंदी घातली आहे. यामुळे येथील तीन गावांमधील अर्थव्यवस्था पूर्णपणे ठप्प झाली असून, २३० कुटुंबांना त्याचा फटका बसला आहे. रोजगाराचा एकमेव मार्गच बंद झाल्यामुळे रहिवासी संकटात असून, पर्यटन हंगाम पूर्ववत होण्याची वाट सर्वजण पहात आहेत.
राज्यातील प्रमुख पर्यटनस्थळांमध्ये घारापुरी बेटांचा समावेश आहे. प्रत्येक वर्षी जवळपास १० लाख पर्यटक येथील लेण्या पाहण्यासाठी येतात. येथील लेण्यांना युनिस्कोने १९८७ मध्ये जागतिक वारसास्थळाचा दर्जा दिला आहे. घारापुरी बेटावर शेतबंदर, राजबंदर व मोराबंदर ही तीन मूळ गावे असून, त्यांची लोकसंख्या जवळपास १,२०० आहे. या गावांमध्ये २३० कुटुंब असून, बहुतांश कुटुंबीयांचा उदरनिर्वाह पर्यटन व्यवसायावरच होत आहे. मुंबईमधील गेट वे आॅफ इंडिया येथून बेटावर पर्यटकांना घेऊन जाण्यासाठी जवळपास १०० प्रवासी बोटी असून, त्यांच्यावर १,५०० नागरिक काम करत आहेत.
कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यामुळे सुरक्षेसाठी १८ मार्चपासून बेट पर्यटकांसाठी बंद करण्यात आले आहे. पाच महिन्यांपासून ही बंदी कायम असल्यामुळे बेटावरील नागरिकांची आर्थिक कोंडी झाली आहे. उत्पन्नाचा एकमेव प्रमुख मार्गच बंद झाला आहे. पहिल्यांदाच घारापुरी बेट एवढ्या प्रदीर्घ काळ बंद राहिले आहे. रहिवाशांना आर्थिक चणचण भासू लागली आहे. ग्रामपंचायतीने व शासनाच्या वतीने आलेले धान्य यापूर्वी रहिवाशांना देण्यात आले आहे, परंतु ही मदत अपुरी पडत आहे.
घारापुरी बेटावरील लेणी नवव्या ते तेराव्या शतकामधील आहेत. मुख्य गुहा जवळपास २७ मीटर आकाराची असून, त्यामध्ये जगप्रसिद्ध त्रिमूर्तीचे शिल्प आहे. याशिवाय अर्धनारी नटेश्वर शिवाची पाच मीटर उंचीची मूर्ती, रावणानुग्रहमूर्ती, अंधकासुर वधमूर्ती, चार मीटर उंचीचे नटराज शिव शिल्प, शंकराने गंगा पृथ्वीवर आणली, यावर आधारित शिल्पाकृती व इतर अनेक प्रसंग दाखविणारे शिल्प येथील खडकांमध्ये कोरले आहेत. बेटाच्या माथ्यावर दोन भव्य तोफा असून, देशात आढळणाऱ्या मोठ्या तोफांपैकी या दोन तोफाही आहेत. समुद्राच्या मध्यभागी असणारे हे बेट पर्यटकांना नेहमीच भुरळ घालत असून, पाच महिने बंद असलेले बेट कधी खुले होणार, याकडे बेटावरील रहिवाशांसह पर्यटकांचेही लक्ष लागले आहे.
>लॉकडाऊनमुळे बेटावरील सर्व व्यवसाय ठप्प आहेत. ग्रामपंचायतीच्या व शासनाच्या माध्यमातून ग्रामस्थांना अन्नधान्याचे वाटप केले होते. मदतीसाठी अनेक प्रकल्प चालकांकडे पत्रव्यवहार करण्यात आला आहे, परंतु संंंबंधितांकडून अद्याप मदत मिळालेली नाही.
- बळीराम ठाकूर, सरपंच

Web Title: Gharapuri Island's economy stagnates, hitting 230 families

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.