घोट नदीत कार पलटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 01:49 AM2018-07-17T01:49:41+5:302018-07-17T01:49:48+5:30
मुसळधार पावसामुळे तळोजामधील घोट नदीमध्ये सोमवारी दुपारी कार नदीमध्ये कोसळली.
- शैलेश चव्हाण
तळोजा : मुसळधार पावसामुळे तळोजामधील घोट नदीमध्ये सोमवारी दुपारी कार नदीमध्ये कोसळली. नदीमधून वाहत जाणारी कार व चार प्रवाशांना घोटमधील ग्रामस्थांनी जीव धोक्यात घालून वाचविले. दोरखंड व जेसीबीच्या साहाय्याने सर्वांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले असून ग्रामस्थांच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे. दुर्घटनाग्रस्त शेख कुटुंबीयांनीही काळ आला होता, पण वेळ आली नव्हती, अशी प्रतिक्रिया देत ग्रामस्थांनी मृत्यूच्या दाढेतून वाचविल्याबद्दल आभार व्यक्त केले आहेत.
पनवेलमधील वावंजे गावामध्ये राहणारे अशरफ खलील शेख (३७) कुटुंबीयांसह कारमधून (एमएच ०२ सीबी ११४९) तळोजा फेज १ कडे जात होते. घोटगावाजवळील नदीच्या पुलावर आले असता त्यांना मुसळधार पावसामुळे रोडचा अंदाज आला नाही व कार नदीमध्ये कोसळली. कारमध्ये अशरफ यांच्याबरोबर त्यांची पत्नी हमीदा शेख (३३), मुलगी सहाणा शेख (७) व पुतणी नमीरा रहमतउल्ला शेख (१७) होते. नदीत पडलेली कार प्रवाहाबरोबर वाहू लागली. खडकावर आदळून कारची काचही फुटली. गाडी अडकून राहिली. ही काच फुटल्यानंतर अशरफ शेख हे गाडीच्या बाहेर आले व लगेच पाण्याबाहेर जाऊन मदत मागितली. येथील रहिवासी लक्ष्मण धुमाळ ऊर्फ बाळा,लहू नारायण पाटील, तुळशीराम बळीराम निघुकर, रूपेश रामा पाटील, ज्ञानेश्वर पाटील, शिवाजी गोंधळी व इतर नागरिकांनी तत्काळ बचावकार्य सुरू केले. नागरिकांनी पाण्यात उडी घेवून दोरखंड कारला बांधला. जेसीबीच्या साहाय्याने कार बाहेर ओढण्यात आली.
कारमधील नागरिक जीव वाचविण्यासाठी कारच्या टपावर बसले होते. अखेर कारसह चारही प्रवाशांना वाचविण्यात यश आले आहे.
>मुसळधार पावसामुळे रस्त्याचा अंदाज आला नाही व कार नदीमध्ये कोसळली. कार वाहू लागल्यामुळे काळजाचा ठोका चुकला होता. ग्रामस्थ देवदूतासारखे धावून आले व जीव धोक्यात घालून आमचे प्राण वाचविले.
- अशरफ शेख,
दुर्घटनाग्रस्त कार चालक