एसटी महामंडाळाला दिलेल्या जागेवर ट्रक टर्मिनलचा घाट; स्थानिकांचा विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 11:25 PM2021-02-20T23:25:10+5:302021-02-20T23:25:22+5:30
स्थानिकांचा विरोध : आवास योजनेच्या घरांसाठी सिडकोचे नियोजन
कमलाकर कांबळे
नवी मुंबई : पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत सिडकोच्या माध्यमातून वाशी ट्रक टर्मिनलच्या जागेवर गृहप्रकल्प उभारला जात आहे. यापार्श्वभूमीवर ट्रक टर्मिनल तात्पुरत्या स्वरूपात वाशी आणि तुर्भे येथील एसटी महामंडळाला डेपोसाठी दिलेल्या जागेवर स्थलांतरित करण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. त्याची प्रक्रियासुध्दा सुरू करण्यात आली आहे. परंतु स्थानिक रहिवाशांकडून विरोध होत आहे. त्यामुळे सिडकोसमोर पेच निर्माण झाला आहे.
सिडकोने पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत एपीएमसीच्या प्रशस्त ट्रक टर्मिनलवर घरे बांधण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार कार्यवाहीसुध्दा सुरू करण्यात आली आहे. परंतु विविध स्तरातून या प्रकल्पाला विरोध होत आहे. विशेषत: एपीएमसी प्रशासनानेसुध्दा सिडकोच्या या प्रकल्पाला विरोध केला असून, थेट न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय घेतला आहे.
विशेष म्हणजे सिडकोने सर्व विरोध धुडाकवून प्रकल्पाच्या कामाला सुरुवात केली आहे. सध्या ट्रक टर्मिनलचा अर्धा भाग पत्रे ठोकून बंदिस्त करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या कामासाठी ट्रक टर्मिनल अन्यत्र स्थलांतरित करण्याची योजना आहे. त्यानुसार तुर्भे सेक्टर २० आणि वाशी सेक्टर २६ येथील एसटी महामंडळाला डेपोसाठी दिलेल्या जागेवर ट्रक टर्मिनल हलविण्याच्या दृष्टीने सिडकोने कार्यवाही सुरू केली आहे.
सिडकोने एसटी महामंडळाला नवी मुंबईत डेपो उभारण्यासाठी तुर्भे सेक्टर २० आणि वाशी सेक्टर २६ येथे अनुक्रमे १५०५३ चौरस मीटर व १६६६२ चौरस मीटर क्षेत्रफळाचे भूखंड दिले आहेत. परंतु तीस वर्षे उलटून गेले तरी एसटी महामंडळाकडून या जागेचा वापर केला गेला नाही. त्यामुळे सिडकोने अनेकदा नोटीस बजावल्या आहेत. परंतु एसटी महामंडळाकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.
परिणामी हे दोन्ही भूखंड परत घेण्याची कार्यवाही सिडकोने सुरू केली आहे. यासंदर्भात राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या प्रमुख उपस्थितीत अलिकडेच एक बैठक पार पडल्याचे समजते. या बैठकीला सिडको, राज्य परिवहन महामंडळ तसेच राज्य सरकारमधील संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार एसटी महामंडळाला डेपोसाठी दिलेल्या दोन्ही जागेचा तात्पुरत्या स्वरूपात ट्रक टर्मिनल म्हणून वापर करण्याचे सिडकोने निश्चित केले आहे.