घोडबंदरकर महावितरणला ठोकणार टाळे
By admin | Published: July 17, 2015 11:08 PM2015-07-17T23:08:32+5:302015-07-17T23:08:32+5:30
घोडबंदर भागातील अनेक ठिकाणी वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडत असल्याने येथील रहिवासी हैराण झाल्याचे वृत्त लोकमतमध्ये प्रसिद्ध होताच त्याची दखल
ठाणे : घोडबंदर भागातील अनेक ठिकाणी वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडत असल्याने येथील रहिवासी हैराण झाल्याचे वृत्त लोकमतमध्ये प्रसिद्ध होताच त्याची दखल आता स्थानिक नगरसेवक आणि व्यापाऱ्यांनीही घेतली आहे. त्यानुसार, येथील स्थानिक नगरसेवक, विभागप्रमुख आणि काही व्यापाऱ्यांनी महावितरणला पत्रव्यवहार केला असून वीजपुरवठा एका आठवड्याच्या आत सुरळीत झाला नाही तर ढोकाळी येथील कार्यालयाला टाळे ठोकले जाईल, असा इशारा त्यांनी महावितरणला दिला आहे.
काही महिन्यांपासून घोडबंदर येथील मानपाडा, शिवाजीनगर, मनोरमानगरचा काही भाग, गणेशनगर, आझादनगर, ब्रह्मांडचा काही भाग, कोलशेतचा काही भाग येथे वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे. विशेष म्हणजे वीजपुरवठा खंडित होण्यामागचे कारण काय, असा सवाल रहिवाशांनी उपस्थित केला असता त्यांना कोणतेही उत्तर महावितरणकडून मिळत नाही. विशेष म्हणजे महावितरणने सुरू केलेल्या कॉलसेंटरवर तक्रार केल्यानंतर पुढे कोणत्याही स्वरूपाची कारवाई होत नसल्याचा अनुभव येथील नागरिकांना वारंवार आला आहे. याकडे महावितरणसोबत स्थानिक लोकप्रतिनिधीही दुर्लक्ष करीत असल्याचा मुद्दा उपस्थित झाला होता. तसेच यासंदर्भातील वृत्तही लोकमतने प्रसिद्ध केले होते. त्यानंतर, आता वृत्ताची दखल घेऊन स्थानिक नगरसेविका मीनाक्षी शिंदे आणि येथील व्यापाऱ्यांनी मानपाडा गाव, मार्केट येथील रहिवाशांच्या सह्यांचे निवेदन महावितरणच्या वागळे येथील मुख्य कार्यालयासह पातलीपाडा आणि ढोकाळी येथील कार्यालयालादेखील दिले आहे. परंतु, महावितरणने या पत्राला उत्तर दिले नाही. आता त्यांना शेवटचा अल्टीमेटम देण्यात आला असून आठवड्याभरात वीजपुरवठा सुरळित न झाल्यास वीजपुरवठा सुरळीत झाला नाही तर ढोकाळी येथील कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा दिला आहे.