जुन्या कसारा घाटात पडले महाकाय खड्डे
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2022 07:45 AM2022-09-19T07:45:46+5:302022-09-19T07:46:17+5:30
मुंबई-नाशिक प्रवास करणाऱ्या हजारो वाहनचालकांना महामार्ग पोलीस घोटी केंद्र व आपत्ती व्यवस्थापन टीमतर्फे रस्त्याच्या उजव्या बाजूने एकेरी बाजूने वाहने घेऊन जाण्याच्या सूचना दिल्या जात हाेत्या
कसारा : मुंबई-नाशिक महामार्गावरील कसारा घाटात आंबा पाॅइंटजवळ दोन महिन्यांपूर्वी रस्त्याला तडे गेले होते. त्यावेळी ठेकेदाराने या रस्त्यावर खडी-डांबराचे अस्तर लावून हा रस्ता दुरुस्त केला हाेता. मात्र, हे काम निकृष्ट झाल्याने जाेरदार पावसाने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व टोल कंपनीच्या या कामाची पाेलखाेल केली आहे. या ठिकाणचे डांबर निघून येथे आठ ते १० फुटांचे लांब खड्डे पडले आहेत.
मुंबई-नाशिक प्रवास करणाऱ्या हजारो वाहनचालकांना महामार्ग पोलीस घोटी केंद्र व आपत्ती व्यवस्थापन टीमतर्फे रस्त्याच्या उजव्या बाजूने एकेरी बाजूने वाहने घेऊन जाण्याच्या सूचना दिल्या जात हाेत्या. जव्हारकडून येणाऱ्या वाहनांनाही ओव्हरटेक न करता घाट उतरण्याच्या सूचना देण्यात येत होत्या.
दरम्यान, जुन्या घाटात रस्त्याला तडा गेल्याने या रस्त्याच्या कामाची चौकशी करण्याची मागणी वाहनचालक करत आहेत.
कसारा घाटात तीन तास रखडपट्टी
कसारा : वीकेंडला फिरायला निघालेल्या पर्यटक आणि वाहनचालकांसाठी रविवारचा दिवस तापदायक ठरला. मुंबई-नाशिक महामार्गावरील कसारा घाटातील माेठमाेठे खड्डे, रस्त्याची कामे आणि काही ठिकाणी बंद पडलेल्या वाहनांनी हा रस्ताच अडवून धरल्यामुळे प्रवाशांना कसारा ते कसारा घाट हे १५ मिनिटांचे अंतर पार करण्यासाठी तीन तास लागले. त्यातच जाेरदार पाऊस आणि खड्ड्यांमुळे मदतकार्यात अडथळे येत असल्याने आणखीनच हाल झाले. त्यामुळे वाहनांच्या भल्यामाेठ्या रांगा लागल्या हाेत्या.
मुंबई-नाशिक महामार्गांवरील कसारा बायपास ते वाशाळा फाटादरम्यान रविवारी सकाळी रस्त्याच्या मध्यभागीच ट्रक बंद पडला हाेता. त्यापुढे काही अंतरावर आणखी एका ट्रकचा एक्सेल पार्ट तुटल्याने तोही रस्त्यात उभा हाेता. वाशाळा फाटा येथे रस्त्याचे काम सुरू असल्यामुळे मोठ्या प्रमाणात खोदकाम केले आहे. त्यामुळे नाशिककडे जाणारी वाहतूक पूर्णतः विस्कळीत झाली होती. महामार्गांवर वाहतूककोंडी साेडवण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन टीम, महामार्ग पोलीस शहापूर केंद्र आणि कसारा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन बंद पडलेली वाहने क्रेनच्या मदतीने बाजूला केली. त्यानंतर एकेरी वाहतूक सुरू करून तब्बल तीन तासांनी नाशिक लेनवरील वाहतूक कोंडी सोडविली. याचदरम्यान सकाळी १०.३० वाजता जुन्या कसारा घाटात जव्हार फाट्याजवळ एका वळणावर कंटेनर रस्त्यालगतच्या नाल्यात उतरल्याने जुन्या कसारा घाटातून नाशिककडे जाणारी वाहतूक पूर्णत: ठप्प झाली. महामार्ग पोलीस घोटी केंद्रच्या कर्मचाऱ्यांनी या घाटातील वाहतूक नवीन कसारा घाटातून नाशिक-मुंबई व मुंबई-नाशिक अशी फिरवली. त्यानंतर नाल्यात उतरलेला कंटेनर क्रेनच्या मदतीने बाहेर काढण्यात आला. त्यानंतर जुन्या कसारा घाटातून नाशिककडे जाणारी वाहतूक पूर्ववत करण्यात आली.