नवी मुंबई : संजय राऊत हे कोणती नशा करतात, हा संशोधनाचा विषय आहे. कारण ते कोणालाही शिव्या घालू शकतात. ते स्वयंभू आहेत. आम्ही त्यांना मोकळे सोडले आहे. त्यांना रोज कोण उत्तर देणार. कारण ते ज्या भाषेत बोलतात, त्या भाषेत उत्तर देणे हे आमच्या संस्कृतीत बसत नाही, अशा शब्दांत राज्याचे ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे.
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोत्ती अभियान अर्थात उमेदच्या माध्यमातून नवी मुंबईत पहिल्यांदाच महालक्ष्मी सरस प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. वाशी येथील सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये भरविण्यात आलेल्या या प्रदर्शनाचे बुधवारी मंत्री महाजन यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. त्याप्रसंगी पत्रकाराशी बोलताना त्यांनी राऊत यांच्यावर टीका केली. आमचे सरकार आणि नेतृत्व महिलांना न्याय देण्यास सक्षम आहे. काही कारणास्तव मंत्रिमंडळाच्या विस्ताराला विलंब झाला आहे. मात्र, आता लवकरच हा विस्तार होणार आहे. त्यावेळी महिलांचा बॅकलॉग नक्कीच भरून काढला जाईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
हे प्रदर्शन ८ ते १९ मार्च २०२३ या कालावधीत सुरू राहणार आहे. या प्रदर्शनात ग्रामीण भागातून आलेल्या बचतगटांच्या वतीने तयार करण्यात आलेल्या विविध वस्तू, खाद्यपदार्थ, गृहोपयोगी साधन सामग्रीची विक्री केली जाणार आहे. महाजन यांनी प्रदर्शनाची पाहणी केली व स्टॉलला भेटी देऊन स्टॉलमध्ये विक्रीकरिता ठेवण्यात आलेल्या वस्तू व पदार्थांची माहिती घेतली.
‘महालक्ष्मी सरस’ ही बचत गटांच्या उत्पादित वस्तूंना मोठी बाजारपेठ उपलब्ध करून देण्याची एक सुवर्णसंधी आहे. मुंबई आणि नवी मुंबईच्या जनतेने महालक्ष्मी सरसला भेट देऊन बचत गटातील उत्पादित वस्तूंची खरेदी करावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
याप्रसंगी ग्रामविकास व पंचायत राज विभागाचे अपर मुख्य सचिव राजेशकुमार मीना, एकात्मिक महिला बाल विकास आयुक्त रुबल गुप्ता, ग्रामीण गृहनिर्माणचे संचालक राजाराम दिघे, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे (उमेद) मुख्य कार्यकारी अधिकारी परमेश्वर राऊत, उपायुक्त (विकास) कोकण विभागीय आयुक्त कार्यालय, गिरीश भालेराव, उमेद अभियानाचे अवर सचिव धनवंत माळी, कोकण विभागीय माहिती उपसंचालक डॉ. गणेश मुळे, पोलिस अधीक्षक संगीता अल्फान्सो, तसेच महाराष्ट्राच्या विविध ठिकाणांहून आलेल्या बचत गटांच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.