नवी मुंबई : कोरोनामुळे तीन दिवसात दोन शरीरसौष्ठवपटूंचे निधन झाले आहे. नवी मुंबईशी नाळ जोडलेल्या या दोन्ही शरीरसौष्ठवपटूंनी अनेक किताब जिंकलेले आहेत. त्यापैकी जगदीश लाड यांनी गुरुवारी रात्रीच पत्नी व मुलीला लवकरच भेटू, असे आश्वासन दिले होते. दुर्दैवाने त्यांच्यातली संभाषणाची ती रात्र अखेरची ठरली.
नवी मुंबईशी नाळ जोडलेल्या दोन शरीरसौष्ठवपटूंचे निधन झाले आहे. या दोघांनीही अनेक पुरस्कारांवर आपले नाव सुवर्ण अक्षरांनी कोरले आहे. वाशीतील प्रसाद लाड हे मागील तीन वर्षांपासून बडोद्याला स्थायिक झाले होते. पत्नी राजलक्ष्मी, ७ वर्षांची मुलगी व भाऊ असे चौघेजण राहायला होते. जगदीश यांचा कोरोनाचा रिपोर्ट निगेटिव्ह आला असतानाही, श्वास घ्यायला त्रास होत होता. यामुळे ते रुग्णालयात दाखल झाले असता, तीन दिवस त्यांची प्रकृती स्थिर होती.
गुरुवारी रात्री १२ वाजेपर्यंत ते पत्नी व मुलीसोबत फोनवर बोलत होते. यावेळी लवकरच आपण सगळे भेटू, असे आश्वासन पत्नी व मुलीला दिले होते. मात्र, शुक्रवारी पहाटे रुग्णालयातून पतीच्या निधनाची माहिती देणाऱ्या आलेल्या फोनने परिवाराला धक्काच बसला. त्यामुळे गुरुवारी रात्री त्यांच्यातले ते संभाषण दुर्दैवाने अखेरचे ठरले.दीर क्वारंटाईन असल्याने व परिसरात जवळचे कोणीही नसल्याने अडचणींना सामोरे जात राजलक्ष्मी यांनीच संपूर्ण प्रक्रिया उरकून अंत्यविधी पार पाडला. परंतु त्यांना बडोदा येथे एकाकीच राहावे लागणार असल्याने नवी मुंबईतल्या त्यांच्या परिचितांना चिंता लागली आहे.
लाखन यांचेही निधन
नेरूळ येथे राहणारे शरीरसौष्ठवपटू मनोज लाखन (३५) यांचेदेखील तीन दिवसांपूर्वी कोरोनामुळे निधन झाले. त्यांनीही मिस्टर इंडियासह अनेक पुरस्कार पटकावले आहेत. मागील दहा दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. परंतु कोरोनावर मात करू न शकल्याने त्यांची प्राणज्योत मालवली.