मित्रांसोबतच्या दारू पार्टीवेळी इमारतीवरून पडून मुलीचा मृत्यू; घातपाताच्या दृष्टीने पोलिसांचा तपास
By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2023 10:28 AM2023-06-10T10:28:51+5:302023-06-10T10:29:34+5:30
ही दुर्घटना नसून घातपात असल्याचा आरोप तिच्या नातेवाईकांनी केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : बेलापूर येथील पडीक इमारतीत काही मित्रांसोबत दारू पार्टीसाठी गेलेल्या १६ वर्षीय मुलीचा इमारतीवरून पडून गुरुवारी मृत्यू झाल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. मात्र, ही दुर्घटना नसून घातपात असल्याचा आरोप तिच्या नातेवाईकांनी केला आहे.
बेलापूर सेक्टर १५ येथील डीमार्ट लगतच असलेल्या अर्धवट स्थितीतल्या पडीक इमारतीमध्ये हा प्रकार घडला. पनवेल परिसरात राहणारी १६ वर्षाची मुलगी तिच्या काही मित्रांसोबत तेथे दारू पार्टी करण्यासाठी गेली होती. इमारतीच्या सातव्या मजल्यावर सर्व जण बसले असताना डक्ट एरियाच्या जवळच बसलेल्या मुलीचा तोल जाऊन ती कोसळल्याने गंभीर जखमी होऊन तिचा मृत्यू झाला.
घटनेनंतर तिच्या मित्रांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार ते त्याठिकाणी दारू पिण्यासाठी गेले होते. त्यामध्ये शेजारच्याच डी मार्टमध्ये काम करणाऱ्या एका मुलाचाही समावेश होता. तर यापूर्वीदेखील ते त्याठिकाणी दारू पिण्यासाठी गेले होते. मुलांनी दारू पिल्यानंतर तिलाही दारू पाजल्याचा आरोप मृत मुलीच्या नातेवाईकांनी केला आहे. त्याठिकाणी ते नेहमी दारू पिण्यासाठी जात होते. पोलिसांनी तिचा मृत्यू अपघात आहे की घातपात आहे? या अनुषंगाने तपास करावा, अशी मागणीही मुलीच्या कुटुंबीयांनी केली आहे.
आदल्या दिवसापासून दोघे होते सोबत
पनवेलला राहणारी १६ वर्षांची मुलगी व तिचा २१ वर्षांचा मित्र यांची जुनी ओळख आहे. त्यांचे एकमेकांवर प्रेम होते व त्याची कल्पना दोघांच्या कुटुंबाना होती, असेही समजते. मुलीचे लग्नायोग्य वय झाल्यानंतर दोघांचे लग्न करून दिले जाणार होते. बुधवारी रात्री ती शाहबाजमध्ये राहणाऱ्या तिच्या मित्राच्या घरी मुक्कामी होती. त्यानंतर गुरुवारी दुपारी ते पडीक इमारतीत गेले असता दुर्घटना घडली.
अल्पवयीन मुलीसोबत घडलेली घटना प्रथमदर्शनी अपघाती असून तिच्यावर अत्याचार झालेला नाही. यासाठी घटनेवेळी तिच्यासोबतच्या मित्रांकडेही सर्व बाजूंनी चौकशी केली आहे. शवविच्छेदनाच्या अहवालानंतर इतरही बाबी स्पष्ट होतील. - गजानन राठोड, सहायक पोलिस आयुक्त, नवी मुंबई.