पनवेल : तळोजा एमआयडीसीमधील पेंधर गावात घर कोसळून अकरा वर्षीय मुलगीचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेत सहा वर्षांचा मुलगा जखमी झाला आहे.
मागील ४८ वर्षांपासूनचे उदय गणा पाटील यांच्या मालकीचे घर आहे. मुन्ना हरिजन नामक व्यक्तीचे कुटुंब या ठिकाणी राहत होते. जुने लोडबेरिंग स्वरूपाचे १९७२ सालचे बांधकाम केलेले हे घर होते. हे घर कोसळून ११ वर्षीय हिना हरिजन ही मुलगी जागीच ठार झाली, तर हंसिका, अनपन व संतोष हे तिघे जण जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय पनवेल येथे दाखल केले आहे.मुन्ना हरिजन हे मूळचे उत्तर प्रदेशातील रहिवासी आहेत. मागील वर्षभरापेक्षा जास्त काळ मुन्नाचे कुटुंब या ठिकाणी वास्तव्यास आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले.
तत्काळ बचाव कार्य राबविले. घटनेची माहिती मिळताच, पालिका आयुक्त सुधाकर देशमुख, पोलीस उपायुक्त अशोक दुधे, स्थानिक नगरसेवक अरविंद म्हात्रे आदींनी घटनास्थळी भेट दिली. मोडकळीस आलेले घर हे १९७२ सालचे होते. घटनास्थळाची पाहणी केली. अशा प्रकारे धोकादायक बांधकामांना पालिका नोटिसा बजावणार आहे.- सुधाकर देशमुख, आयुक्त, पनवेल महानगरपालिका
पालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणात अशा प्रकारची मोडकळीस आलेली घरे पालिका बांधकाम परवानगी देत नसल्याने दुरुस्तीअभावी धोकादायक परिस्थितीत उभी आहेत. पालिकेने याबाबत निर्णय न घेतल्यास अशा घटनांची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.- अरविंद म्हात्रे, नगरसेवक
सिटी सर्व्हे रखडले : पालिका क्षेत्रातील २९ गावांमध्ये अशा प्रकारे धोकादायक घरांची संख्या वाढत चालली आहे. सिटी सर्व्हेअभावी ही प्रक्रिया रखडली असून, पालिकेमार्फत सिटी सर्व्हेकरिता पैसे भरण्याची तयारीही संबंधित विभागाने दाखविली असल्याचे आयुक्त देशमुख यांनी सांगितले