नवी मुंबई - महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. नवी मुंबईतील तुर्भे स्थानकावर एका विकृतानं तरुणीचा विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे. या विकृतानं भर स्थानकात या तरुणीचं जबरदस्तीनं चुंबन घेण्याचा प्रयत्न केला. आरोपीला तरुणीनं हटकल्यानंतर त्यानं तिथून पळ काढला. या धक्कादायक घटनेचे सीसीटीव्ही फुटेजदेखील समोर आले आहे. दरम्यान, रेल्वे सुरक्षा दलाच्या सतर्क जवानांनी या विकृताच्या काही वेळातच मुसक्या आवळल्या. आरोपी हा 43 वर्षांचा असल्याची माहिती समोर आली आहे.
नरेश के जोशी असे या आरोपीचे नाव आहे. तरुणीनं केलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. वाशी लोहमार्ग पोलिसांकडे हा गुन्हा वर्ग करण्यात आला आहे. आरोपीला वाशी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 20 वर्षांची असलेली तरुणी ही तुर्भे येथील रहिवासी असून ती गुरुवारी ( 22 फेब्रुवारी ) सकाळी घणसोलीच्या दिशेनं प्रवास करण्यासाठी स्थानकात लोकलची वाट पाहत उभी राहिली होती. यावेळी स्टेशनवर एका विकृतानं मागून तिला मिठी मारली आणि जबरदस्तीनं तिचं चुंबन घेण्याचा प्रयत्न केला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे तरुणी घाबरली मात्र लगेचच तिनं स्वतःला सावरत या विकृताचा प्रतिकार केला. यानंतर काही झालं नाही असा आव आणत विकृतानं तिथून पळ काढला.
हा सर्व धक्कादायक प्रकार स्थानकातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या कंट्रोल रुममध्ये बसलेले आरपीएफचे कॉन्स्टेबल निलेश दळवी आणि राहुल कुमार यांनी हा प्रकार कॅमेऱ्यात पाहिला. यानंतर त्यांनी तातडीने प्लॅटफॉर्मवर धाव घेत आरोपीच्या मुसक्या आवळल्या.